नगर निकाय निवडणुकीची धुरा आ. विवेक कोल्हेंच्या खांद्यावर; ‘ट्रिपल इंजिन’ सरकारची ताकद वाढविण्यासाठी भाजपची तळागाळात मोर्चेबांधणी

कोपरगाव वृत्त वेध:
राजस्थानातील आगामी नगर निकाय निवडणुकीचे राजकीय रण पेटण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. पाली येथील निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, जबाबदारी स्वीकारताच त्यांनी पालीत प्रत्यक्ष मैदानात उतरून भाजपच्या विजयासाठी ‘बूथ’ पातळीवर व्यूहरचना सुरू केली आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कोल्हे यांची पालीच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली ही जबाबदारी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे राजस्थानच्या निवडणूक मैदानात महाराष्ट्रातील भाजपची संघटनात्मक रणनीती कितपत प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पालीत पोहोचताच संघटन ‘ॲक्शन मोड’मध्ये
आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी निवडणूक निरीक्षक नरेंद्र पवार यांच्यासमवेत पाली येथील भाजप जिल्हा कार्यालयास भेट दिली. यावेळी पाली भाजप परिवाराच्या वतीने पारंपरिक साफा बांधून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर झालेल्या बैठकीत आगामी नगर निकाय निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि बूथ व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणुकीत विजयाचा पाया बूथपासूनच मजबूत होतो, हे लक्षात घेऊन प्रत्येक बूथ सक्षम करण्याचा भाजपचा निर्धार या बैठकीत अधोरेखित करण्यात आला. कार्यकर्त्यांची बांधणी, मतदारांशी प्रभावी जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
‘ट्रिपल इंजिन’ला बळ देण्याची रणनीती
महाराष्ट्रातून राजस्थानात गेलेले भाजपचे पदाधिकारी आणि पाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठकही पार पडली. आगामी नगर निकाय निवडणुकीत पालीमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासोबतच राजस्थानातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत रणनीती आखण्यात आली.
स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने निवडणूक मैदानात उतरावे, पक्षाची ताकद प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावी आणि बूथनिहाय संघटन अधिक मजबूत करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.
‘बूथ जिंका, निवडणूक जिंका’चा कोल्हेंचा संदेश
आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, “आगामी नगर निकाय निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सशक्तीकरण, प्रभावी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. पालीतील कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि ऊर्जा भाजपच्या विजयासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. नगर निकाय निवडणुकीत भाजपचा निश्चितच विजय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचा ‘बूथ मॉडेल’ राजस्थानात?
पालीच्या निवडणुकीची जबाबदारी आ. कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आल्याने महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक अनुभवाचा राजस्थानात वापर होण्याची शक्यता आहे. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि मतदारांशी थेट संपर्क या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भाजप पालीतील निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसमोर स्थानिक समीकरणे, मतदारांचा कल आणि संघटनात्मक आव्हाने असताना पालीचा गड सर करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्रातील आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे पालीच्या निवडणुकीत भाजपची ही ‘बूथबांधणी’ विजयाचा मार्ग कितपत प्रशस्त करते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
यावेळी पाली जिल्हा महामंत्री नारायण कुमावत, भाजप प्रवक्ते मंगलराम प्रजापत, प्रताप मंडल अध्यक्ष मानवेन्द्रसिंह भाटी, शिवाजी मंडल उपाध्यक्ष अभिषेक दुग्गड, प्रताप मंडल महामंत्री कैलाश गौड, प्रताप मंडल मंत्री अजय वैष्णव, जिलामंत्री प्रताप सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
