टीसीएसचे ग्लोबल हेड यांचा संजीवनीच्या नवोदित विद्यार्थ्यांना कानमंत्र; ‘दृष्टी २ के २६’मध्ये करिअरच्या बदलत्या वाटांवर मार्गदर्शन
कोपरगाव वृत्त वेध:
मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करा आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अखंड परिश्रम करण्याची तयारी ठेवा. बदलत्या जागतिक स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून प्रभावी संवादकौशल्य, परदेशी भाषांचे ज्ञान, व्यावसायिक नेटवर्क आणि सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक आव्हानात संधी शोधा, नवकल्पनांना स्वीकारा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, असा रोखठोक कानमंत्र टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड सथ्यनारायण मेहता यांनी संजीवनीच्या नवोदित विद्यार्थ्यांना दिला.
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दृष्टी २ के २६’ कार्यक्रमात मेहता प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, विविध विभागप्रमुख आणि डीन्स उपस्थित होते.
कॉलेजचा पहिला दिवसच करिअरचा पहिला टप्पा!
“कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे केवळ शिक्षणाची सुरुवात नाही, तर करिअरच्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे,” असे सांगत मेहता यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले.
योग्य वृत्ती, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची सवय अंगीकारा. कोणतेही काम हाती घेतले तरी त्यामध्ये समर्पण, सातत्य आणि उत्कृष्टतेची जिद्द कायम ठेवा. यशासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर कामाप्रती असलेली बांधिलकी आणि सातत्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतरांशी नाही, स्वतःशीच स्पर्धा करा!
आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या कामगिरीशीच स्पर्धा केली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण संदेश मेहता यांनी दिला.
तंत्रज्ञानातील वेगवान बदल स्वीकारा, नवनवीन कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवा. समाज, उद्योगक्षेत्र आणि जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पदवीपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व
इंटर्नशिप, प्रोजेक्ट वर्क आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रत्येक संधीचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लाभ घ्यावा. केवळ पदवी मिळविणे हे अंतिम ध्येय नसून उद्योगविश्वाच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार स्वतःला सक्षम बनविणे महत्त्वाचे आहे, असे मेहता यांनी नमूद केले.
चुका होणे स्वाभाविक आहे; मात्र केलेल्या चुका पुन्हा होऊ न देणे हेच यशस्वी होण्याचे खरे लक्षण आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट : विकसित भारताचे भावी शिल्पकार बना!
‘एआयच्या नव्या युगात तुमचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे ही पिढी केवळ नोकरी शोधणारी नव्हे, तर भविष्यातील संधी निर्माण करणारी ठरली पाहिजे,’ असे अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे यांनी सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. या परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात आजचे विद्यार्थी हे केवळ विद्यार्थी नसून विकसित भारताचे भावी शिल्पकार आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
संजीवनीला गुणवंत आणि यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा लाभला असून जगातील विविध देशांमध्ये आणि नामांकित संस्थांमध्ये संजीवनीचे विद्यार्थी नेतृत्वाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नव्या विद्यार्थ्यांनीही जागतिक स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली. संजीवनी केवळ पदवी देणार नाही, तर जबाबदार, सक्षम आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कटिबद्ध नागरिक घडविण्याचे काम करेल, असा विश्वासही अमित कोल्हे यांनी व्यक्त केला.
वृत्तवेधचा संदेश
पदवी हातात येईल; पण करिअर घडविण्यासाठी कौशल्य, अनुभव आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारीच निर्णायक ठरणार आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
