साईबाबा कॉर्नर-कोल्हे कारखाना रस्त्याला २० कोटी; चौपदरीकरणाचा श्रीगणेशा.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; साईबाबा कॉर्नरवर उड्डाणपूल उभारण्याची ‘वृत्तवेध’ची मागणी

कोपरगाव वृत्तवेध :

साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय रस्ते निधीतून मिळालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबा कॉर्नर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यापर्यंत सिमेंट काँक्रेट चौपदरी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. २९) उत्साहात झाले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे होते.


दररोज ३० ते ४० हजार नागरिकांची ये-जा
साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना हा मार्ग दररोज सुमारे ३० ते ४० हजार नागरिकांच्या वापरात असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्याचे काम दीर्घकाळ टिकेल, अशा दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कामासाठी संजीवनी उद्योग समूह, औद्योगिक वसाहत आणि कोपरगाव नगरपालिका यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकडे वाढणारी भाविकांची वाहतूक तसेच कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे या मार्गाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे २० कोटींच्या निधीतून होणारा हा आधुनिक रस्ता कोपरगावच्या पूर्व भागाच्या विकासाला गती देणारा ठरणार असून, विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि कारखान्यांच्या वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आभार वैभव आढाव यांनी मानले.


चौकट | ‘स्वर्गीय शंकरराव कोल्हे मार्ग’ नाव देण्याची मागणी
साईबाबा कॉर्नर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यापर्यंत होणाऱ्या चौपदरी सिमेंट काँक्रेट रस्त्याला ‘स्वर्गीय शंकरराव कोल्हे मार्ग’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांनी कार्यक्रमादरम्यान केली.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या