कोपरगाव ऑनलाइन राजेंद्र सालकर : राज्यासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उपलब्ध पाणीसाठे झपाट्याने कमी होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या साठवण तलावांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिक, पशुधन तसेच रब्बी व चारा पिकांसाठी पाण्याची गंभीर गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांचे आवर्तन २० नोव्हेंबरपूर्वी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १ डिसेंबर रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने सध्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोपरगाव शहरालाही सध्या सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या साठवण तलावांची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्यापूर्वी उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रब्बी पिकांसमोर संकट
शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्याचे आवर्तन अपेक्षित धरून रब्बी हंगामातील पिकांची तसेच चारा पिकांची लागवड केली आहे. मात्र, आवर्तन १ डिसेंबरपर्यंत लांबले तर पिकांना आवश्यक वेळी पाणी मिळणार नाही. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी पिकांनाही फटका बसण्याची भीती आहे.
दरम्यान, भूजलपातळीत मोठी घट झाली असून अनेक विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे केवळ भूजलावर अवलंबून राहून रब्बी पिके व चारा पिकांचे संरक्षण करणे कठीण होणार आहे.
२० नोव्हेंबरपूर्वी आवर्तनाची मागणी
दुष्काळी परिस्थिती, घटलेली भूजलपातळी, कमी होत चाललेले पिण्याच्या पाण्याचे साठे आणि रब्बी पिकांची गरज लक्षात घेता १ डिसेंबरपर्यंत आवर्तनाची प्रतीक्षा करणे धोकादायक ठरू शकते, असे आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे नागरिक, पशुधन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी गोदावरी कालव्यांचे रब्बी आवर्तन २० नोव्हेंबरपूर्वी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
चौकट : पाण्याचे नियोजन तातडीचे
दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीचे पाणी यांचे संतुलित नियोजन करणे आवश्यक आहे. शहराचा पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पशुधनासाठी पाणी तसेच रब्बी आणि चारा पिकांची गरज लक्षात घेऊन कालव्याचे आवर्तन लवकर सोडल्यास संभाव्य पाणीटंचाईचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
