विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ४२० पदांच्या निर्मितीसह १५ मदत केंद्रे आणि नियंत्रण कक्षाला मंजुरी
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महामार्गावर १५ पोलिस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली असून, शिर्डीजवळील कोकमठाण इंटरचेंजलाही या सुरक्षा व्यवस्थेत स्थान मिळाले आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली.
लूटमारीच्या घटनांनंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून लूटमार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. वेगवान प्रवासासाठी उभारलेल्या महामार्गावर प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावर पुरेसे पोलिस मनुष्यबळ तैनात करावे आणि रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
५०.९३ कोटींच्या खर्चाला मंजुरी
गृह विभागाने ३ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, १५ महामार्ग पोलिस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ४३ कोटी ४७ लाख ३३ हजार ४२४ रुपये आवर्ती खर्च, तर ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ९६६ रुपये अनावर्ती खर्च मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही मिळून हा खर्च सुमारे ५०.९३ कोटी रुपये आहे.
४२० पदांमुळे सुरक्षा यंत्रणेला बळ
या व्यवस्थेसाठी १६ सहायक पोलिस निरीक्षक, ३२ पोलिस उपनिरीक्षक, ४८ सहायक पोलिस उपनिरीक्षक, २७६ पोलिस शिपाई आणि ४८ चालक पोलिस शिपाई अशी एकूण ४२० पदे निर्माण करण्यात आली आहेत. या मनुष्यबळामुळे समृद्धी महामार्गावरील पोलिस यंत्रणेची उपस्थिती वाढविण्यास मदत होणार आहे.
कोकमठाण केंद्रामुळे शिर्डी परिसराला दिलासा
आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या शिर्डी तीर्थक्षेत्राच्या जवळ कोकमठाण इंटरचेंज येथे पोलिस मदत केंद्र मंजूर झाल्याने या परिसरातील महामार्ग सुरक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या केंद्रासाठी २७ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध होणार असल्याचे आमदार कोल्हे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग नसून, लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था सक्षम होणे, पोलिसांची तत्पर मदत उपलब्ध होणे आणि प्रवाशांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होणे अपेक्षित आहे. या निर्णयाबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
