एसीपी सोहेल शेख यांच्या हस्ते हॉकी सामन्यांचे उद्घाटन; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
कोपरगाव वृत्तवेध:
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत काळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इंटर हाऊस हॉकीच्या मैत्रीपूर्ण सामन्यांसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ऑरेंज, ब्ल्यू, ग्रीन आणि यलो हाऊसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केल्याने हॉकीच्या मैदानावर चुरस आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे आणि सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व भक्कम पाठबळामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विविध संधी उपलब्ध होत आहेत. त्यातून शाळेने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागप्रमुख रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद आणि महेश गोंडे यांच्या नियोजनातून हॉकी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या सामन्यांचे उद्घाटन मीरा-भाईंदर नवघर विभागाचे एसीपी सोहेल शेख यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एसीपी सोहेल शेख यांनी क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य, शिस्त, संघभावना आणि मेहनत या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपले क्रीडागुण दाखवून दिले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि चारही हाऊसच्या हाऊस मास्टर्स यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य नूर शेख यांनी मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
