शेती, पाणी, कचरा ते आरोग्य… ‘स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन’मध्ये ४०० विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता पणाला
कोपरगाव वृत्तवेध:
कोपरगावच्या रस्त्यावरची समस्या असो, शेतकऱ्यांच्या पिकांची अडचण असो, पाणी वितरणाचा प्रश्न असो किंवा कचऱ्याचा डोंगर… प्रश्न स्थानिक असला तरी त्याचे उत्तर आता जागतिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधण्याची वेळ आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नवकल्पनांच्या बळावर स्थानिक समस्यांना स्मार्ट आणि परिणामकारक उत्तर द्या, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.
संजीवनी विद्यापीठात आयोजित ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते.
‘एआय’ फक्त मोबाईलपुरते नको; शेतातही पोहोचवा!
भारताची ५० ते ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे एआयचा उपयोग केवळ संगणक आणि उद्योगांपुरता मर्यादित न ठेवता शेती, वाहतूक, आरोग्य, अन्नसुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन, औद्योगिक अडचणी आणि पाणी वितरण यांसारख्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडित प्रश्नांवर झाला पाहिजे, असे विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक प्रश्नांची जाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील समस्यांवरही जगाला उपयोगी पडतील असे उपाय निर्माण होऊ शकतात. हॅकॅथॉन ही विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष समस्यांशी जोडणारी प्रयोगशाळा ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
१०० टीम; ४०० तरुणांची ‘स्मार्ट’ झुंज!
कोपरगाव आणि ग्रामीण भागातील शेती, शिक्षण, अन्न व सुरक्षा, दळणवळण, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि खुल्या नवकल्पना अशा विविध विषयांवरील समस्या सोडविण्यासाठी देशभरातून १०० टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. सुमारे ४०० अभियांत्रिकी विद्यार्थी आपल्या कल्पना आणि तंत्रज्ञानाची ताकद पणाला लावत आहेत.
संजीवनी विद्यापीठाकडून विजेत्या प्रकल्पासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. विवेक कोल्हे यांनीही आणखी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पाला प्रायोजित करण्यात येईल, अशी घोषणा अमित कोल्हे यांनी केली.
नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्याची ताकद निर्माण करा!
युवकांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले. भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून देशाची सर्वात मोठी ताकद युवा शक्ती आहे. या युवा शक्तीने ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या जोरावर देशाच्या आर्थिक प्रगतीला अधिक वेग द्यावा, असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञान वाढले; पण निसर्ग हरवू नये!
तहसीलदार तथा पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी महेश सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर पर्यावरणीय संतुलनाचा मुद्दा मांडला. मानवाने अश्मयुगापासून प्रगती केली; मात्र विकासाच्या या प्रवासात निसर्गाशी सुसंवाद राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या विकासाचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतात. त्यामुळे तंत्रज्ञानाला संवेदनशीलतेची जोड हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजहिताचे काम करून पुढील पिढ्यांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. या हॅकॅथॉनमधून नव्या कल्पना, नवी ऊर्जा आणि नवे ध्येय पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात ग्लोबल तंत्रज्ञान
अमित कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि जागतिक संधी उपलब्ध करून देणे हे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्याच विचारातून संजीवनी विद्यापीठाची उभारणी झाली असून ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.देशासमोरील आव्हानांवर उपाय शोधताना युवकांनी केवळ रोजगाराचे लाभार्थी न राहता नवीन कल्पना, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचे भागीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर यांनी स्वागत करून हॅकॅथॉनची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, हनुमंत फेरे आदी उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
