येत्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांचे चित्र बदलेल; अच्युत गोडबोले यांचा विद्यार्थ्यांना इशारा
कोपरगाव वृत्तवेध:
तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढला असून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. येत्या पाच वर्षांत एआयमुळे सर्वच क्षेत्रांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयला केवळ नवीन तंत्रज्ञान न मानता भविष्यातील संधी म्हणून स्वीकारावे आणि त्याचा प्रभावी वापर आत्मसात करावा, असे प्रतिपादन प्रख्यात तंत्रज्ञान अभ्यासक व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तसेच एमबीएच्या प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन समारंभात गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते.
२४ तास ४५ मिनिटांत दहा मजली इमारत!
तंत्रज्ञानातील बदलांचा वेग स्पष्ट करताना गोडबोले यांनी थ्री-डी प्रिंटिंग आणि एआयच्या वाढत्या वापराकडे लक्ष वेधले. थ्री-डी प्रिंटिंग आणि एआयच्या मदतीने अवघ्या २४ तास ४५ मिनिटांत दहा मजली इमारत उभारण्याचा विक्रम शक्य झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
एआयच्या मदतीने रचना, नियोजन आणि अंमलबजावणी अधिक अचूक व जलद होत असल्याने वेळ, खर्च आणि मनुष्यबळाची बचत होत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाधारित कामकाजाला अधिक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांची भूमिकाही बदलणार!
एआयमुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अधिक सुलभ होईल. भविष्यात शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक आणि शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारा समन्वयक म्हणून अधिक महत्त्वाची ठरेल, असे गोडबोले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच एआयचे ज्ञान, तंत्रज्ञानाची समज आणि बदलत्या काळातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. बदलाची चाहूल घेऊन त्यानुसार स्वतःला तयार करणारे विद्यार्थीच भविष्यात आघाडीवर राहतील, असा संदेश त्यांनी दिला.
नोकरी, उच्च शिक्षण की उद्योजकता? निर्णय आताच घ्या!
अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासून आपल्या शाखेतील भविष्यातील संधींचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. द्वितीय वर्षापासून नोकरी, उच्च शिक्षण किंवा उद्योजकता यापैकी कोणता मार्ग स्वीकारायचा, याचा विचार करून त्यानुसार कौशल्यविकास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखेचे सखोल ज्ञान, विविध कौशल्ये आणि परदेशी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते. जपानी, रशियन, जर्मन किंवा कोरियन यापैकी एका भाषेचे ज्ञान आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधी वाढू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना ‘लोकल टू ग्लोबल’ची दिशा
डॉ. आर. ए. कापगते यांनी स्वागतपर भाषणात संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी रुजविलेल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा वारसा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे पुढे नेत असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देत ‘लोकल टू ग्लोबल’ हा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, डॉ. आर. ए. कापगते, डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. ए. बी. पवार, डॉ. व्ही. एम. तिडके आदी उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
