कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेतीपूरक मतदारसंघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी दणदणीत विजय मिळवला. बिनविरोध निवडीची शक्यता फोल ठरल्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपले स्थान पुन्हा अधोरेखित केले.
आमदार आशुतोष काळे हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतीपूरक मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता होती. मात्र, एकमत न झाल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.
विजयाची शक्यता असतानाही काळे यांनी गाफील न राहता सहकार विकास आघाडीच्या नेत्यांच्या सहकार्याने मतदारांशी संपर्क साधला. स्वतःची यंत्रणा उभी करून त्यांनी प्रचारावर भर दिला. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला.
२०१७ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मिळवलेल्या यशानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही काळे यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, काही जागांवर एकमत न झाल्याने निवडणूक झाली. लोकशाहीचा आदर ठेवून निवडणुकीला सामोरे गेलो आणि मतदारांनी दणदणीत विजय मिळवून दिला, अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. या विजयासाठी त्यांनी मतदार, सहकार विकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
