कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील मूलभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी ४ कोटी ६ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक ४, ७, १० आणि १४ मध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारी व नाले दुरुस्ती आणि पेव्हर ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांत गुणवत्तेशी तडजोड अथवा टक्केवारीची पद्धत खपवून घेतली जाणार नाही. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दिला.
विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, संबंधित प्रभागांतील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्ते, गटारी आणि पेव्हर ब्लॉकची कामे
पहिल्या टप्प्यात तुळजाभवानी मंदिर ते भुसारी मार्गाच्या विकासासाठी २६.२५ लाख रुपये, सप्तर्षी मळ्यात पेव्हर ब्लॉकसाठी ८.४८ लाख रुपये, किसन जाधव घर ते नंदू घोडेराव घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ७.८६ लाख रुपये, बाळासाहेब पोकरे घर ते संजय माळी घर रस्त्यासाठी ७.९६ लाख रुपये आणि किशोर थोरात घर ते किसन जाधव घर रस्त्यासाठी १२.६७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महाबली हनुमान मंदिर परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये, वाबळे घर ते ढगारे घर मार्गावर पेव्हर ब्लॉकसाठी १४.४५ लाख रुपये, श्रद्धानगरीतील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ६.९२ लाख रुपये आणि मुंदडा घर ते अजय क्लॉथ सेंटरपर्यंत भुयारी गटार बांधण्यासाठी १४.९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील गटारी, नाले दुरुस्ती आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांसाठी ९.९८ लाख रुपये खर्च होणार आहेत.
प्रशासकीय गैरकारभाराची चौकशी करण्याचा इशारा
नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आगामी काळात २० कोटी आणि ८ कोटी रुपयांच्या निधीतून आणखी विकासकामे प्रस्तावित असल्याचे आमदार कोल्हे यांनी सांगितले. प्रशासकीय काळातील कथित गैरकारभाराची गय केली जाणार नाही. भ्रष्टाचाराचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांचा दर्जा टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, ठेकेदारांनी नियमांनुसार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
दिवाळीनंतर ‘नगरपालिका आपल्या दारी’
दिवाळीनंतर ‘नगरपालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिका अधिकारी विविध प्रभागांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधतील. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. दुष्काळी परिस्थितीतही नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सहकारी नगरसेवक आणि सभापती यांच्या कामाचे कौतुक केले. बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी आभार मानले.
वृत्तवेध ऑनलाईन | कोपरगाव
सत्य जे असरदार
संपर्क : ९९ २१ ३९ २३ २३
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

