कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपला मिळावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. बँक चालवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याने सर्वसामान्यांना मान्य होईल, असा निर्णय होईल, अशी अपेक्षा भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय चर्चेला वेग आला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान माध्यमांशी बोलताना विवेक कोल्हे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा प्रतिनिधी असावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असली, तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपची भूमिका आणि अन्य गटांशी जुळणारे सहकारातील समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शंकरराव गडाख यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. मागील निवडणुकीत सुमारे १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या; यंदा मात्र तसे चित्र दिसले नाही, असे कोल्हे यांनी सांगितले.
सहकारात एकत्र, इतर निवडणुकांत स्वतंत्र!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काळे आणि कोल्हे एकत्र दिसल्याबाबत विचारले असता, सहकारातील निवडणुकांचे राजकारण वेगळे असल्याचे विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले. सहकारातील निवडणुका आल्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येतात. मात्र, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या भूमिकेनुसार स्वतंत्रपणे लढतो, असे त्यांनी सांगितले.
कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे सहकारातील एकत्रित राजकीय भूमिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वत्रिक निवडणुकांतील पक्षीय स्पर्धा यांमधील फरक अधोरेखित झाला आहे. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपची इच्छा प्रत्यक्षात उतरते का आणि अंतिम निर्णयात कोणत्या गटाला संधी मिळते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
