कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
एसटी महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल पद्धतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) १ ऑगस्टपूर्वी काढून घ्यावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
महायुती शासनाच्या निर्णयानुसार एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, वेळेत नोंदणी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
सुरेगाव (कोळपेवाडी) बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांना एसटी प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ५० टक्के सवलत या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थींनाही शासनाच्या नियमानुसार प्रवास सवलतींचा लाभ उपलब्ध होणार आहे.
एनसीएमसी कार्डमुळे तिकीटासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज राहणार नाही. मोबाईलप्रमाणे कार्ड रिचार्ज करून कॅशलेस पद्धतीने तिकीट काढता येणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सुलभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, वयाचा पुरावा, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास), विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक आणि चालू मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. पात्र नागरिकांनी १ ऑगस्टपूर्वी जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी करून कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही आमदार काळे यांनी केले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, अंबादास धनगर, सुनिल कोळपे, महेश कोळपे, मोतीराम निकम, ओंकार बिडगर, प्रकाश नवघरे, राजेंद्र कोळेकर, चव्हाण साहेब, दिलीप कोळपे, अनिल बनकर, स्थानक प्रमुख प्रकाश हिरे तसेच ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
