कोपरगाव : गेल्या काही दिवसांपासून सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने त्रस्त झालेल्या कोपरगावकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. शहरात आता पुन्हा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला असून, ही माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.
पावसाअभावी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नगरपरिषदेकडून काही काळासाठी पाणीपुरवठ्याचे अंतर चार दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आले होते. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि शहरातील जलसाठा सुरक्षित राहावा, हा त्यामागील उद्देश होता.
दरम्यान, सध्याच्या जलस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्वीप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दैनंदिन पाणीटंचाईचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर आणि पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे उपस्थित होत्या.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होत असला तरी पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. घरांमध्ये गळती होणारे नळ तातडीने दुरुस्त करावेत, आवश्यक ठिकाणी तोट्या बसवाव्यात आणि पाणी बचतीची सवय कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
नगरपरिषद शहराला नियमित, दर्जेदार आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
