कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
निराधार, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कोपरगावात प्रशासनाला चांगलीच गती देण्यात आली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे ८१ आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १२० असे एकूण २०१ अर्ज मंजूर करण्यात आले.
बैठकीत आ. काळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, “पात्र लाभार्थी कागदपत्रांच्या नावाखाली हेलपाटे मारणार नाहीत आणि एकही पात्र नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.”
प्रलंबित अर्जांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
गावागावांत व्यापक जनजागृती करून पात्र नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे, अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्यावरही त्यांनी भर दिला.
आ. काळे म्हणाले, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या समाजातील सर्वात गरजू घटकांसाठी जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब न करता लाभ मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, रक्ताटे मॅडम, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राहुल शिरसाठ, अरुण त्रिभुवन, प्रकाश रुईकर, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, एकनाथ गंगुले, सिद्धार्थ शेळके आदी उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
