कोपरगाव वृत्त वेध:
अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा गंभीर आजारांच्या उपचारांदरम्यान वेळेत रक्त उपलब्ध होणे रुग्णांच्या जीवितासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन कोपरगाव शहरातील निवारा परिसरात ‘लायन्स समता ब्लड सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या रक्तकेंद्रामुळे कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना सुरक्षित रक्त वेळेत उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या रक्तकेंद्राचा उद्घाटन सोहळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. नाशिक येथील समता ब्लड सेंटर आणि देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सहकार्य या उपक्रमाला लाभणार आहे.
‘रक्तदानाइतकेच रक्ताची सुरक्षित साठवण महत्त्वाची’
उद्घाटनप्रसंगी विखे पाटील यांनी समता परिवार आणि लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी संकलित रक्ताची तपासणी, सुरक्षित साठवणूक आणि गरजेच्या वेळी रुग्णाला उपलब्ध करून देणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लायन्स समता ब्लड सेंटर’ ही गरज प्रभावीपणे पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रक्तासाठी नातेवाईकांची धावपळ कमी होणार
समता चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक संदीप कोयटे यांनी रक्तकेंद्र उभारण्यामागील भूमिका स्पष्ट केली. रुग्णाला रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर नातेवाईकांची होणारी धावपळ आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुरक्षित रक्त उपलब्ध करून देणे हा केंद्राचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, प्रसूतीतील महिला आणि गंभीर आजारांवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेकदा तातडीने रक्ताची गरज असते. अशा वेळी वेळ वाचवून रक्त उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एका रक्तदानाचा अनेक रुग्णांना फायदा
‘लायन्स समता ब्लड सेंटर’मध्ये अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रक्तावर प्रक्रिया करून १८ प्रकारचे रक्तघटक तयार करण्याची सुविधा येथे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानाचा उपयोग एकापेक्षा अधिक रुग्णांसाठी करता येणार आहे.या रक्तकेंद्राची ४ हजार रक्तपिशव्या साठविण्याची क्षमता असून, दुर्मिळ रक्तगट उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
गरजू रुग्णांना दरमहा ५० रक्तपिशव्या मोफत
कोपरगाव परिसरातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी दर महिन्याला ५० रक्तपिशव्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विवेक कोल्हेंकडून उपक्रमाचे कौतुक
विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कोपरगाव शहराची आरोग्यविषयक गरज ओळखून अद्ययावत सुविधांनी सज्ज रक्तकेंद्र उभारण्यात आले असून, गरजू रुग्णांना रक्ताच्या माध्यमातून जीवनदान देण्याचे काम या केंद्रातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लायन्स इंटरनॅशनलचे डायरेक्टर एम.जे.एफ. ला. राज मुच्छाल यांनीही उपक्रमाचे कौतुक केले. हे देशातील ५२ वे लायन्स ब्लड सेंटर असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्राला राष्ट्रीय पातळीवर आवश्यक सहकार्य व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
१८ वर्षे पूर्ण होताच कुलदीप कोयटेंचे रक्तदान
समाजसेवेची परंपरा जपणाऱ्या कोयटे परिवारातील कुलदीप कोयटे यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच प्रथमच रक्तदान केले. युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी खोरे दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम.जे.एफ. ला. श्रेयस दीक्षित, महानंदा दूध संघाचे संचालक राजेश जाधव, उद्योजक सम्राट वर्मा, अरविंद भन्साळी, कैलास ठोळे, चांगदेव कातकडे, समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा, डॉ. इरफान पठाण यांच्यासह लायन्स क्लब, समता चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्तवेधचा विशेष संदेश : रक्तदान करा, जीवन वाचवा!
कोपरगावात सुरू झालेले ‘लायन्स समता ब्लड सेंटर’ केवळ रक्तसाठवणूक केंद्र न राहता गरजू रुग्णांना वेळेत रक्त आणि रक्तघटक उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी नियमित रक्तदान करून या सेवाभावी उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
