कोपरगाव | वृत्तवेध :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला योग्य संधी आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मोठी सामाजिक क्रांती घडू शकते, हे संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीने कृतीतून दाखवून दिले आहे. बारावीची विद्यार्थिनी साईश्रद्धा अरविंद सालमुठे हिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी बसच्या वेळा, मार्ग आणि रिअल-टाईम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे अभिनव सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना कोणतेही साईन-अप किंवा लॉगिन करण्याची गरज नाही. बसस्थानक अथवा संबंधित ठिकाणी उपलब्ध असलेला क्यूआर कोड स्कॅन करताच थेट संकेतस्थळावर संबंधित बसची वेळ, मार्ग आणि आवश्यक माहिती उपलब्ध होते.
नाशिक-अहिल्यानगरमध्ये प्रणाली कार्यान्वित
साईश्रद्धाने विकसित केलेली ही प्रणाली सध्या नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात यशस्वीपणे कार्यान्वित असून दररोज मोठ्या संख्येने एसटी प्रवासी तिचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाची उपयुक्तता आता व्यापक स्तरावर पोहोचली आहे.
भारत सरकारचे युटिलिटी पेटंट; ‘परिवहन दूत’ म्हणून गौरव
या अभिनव प्रकल्पाची दखल घेत भारत सरकारकडून साईश्रद्धाला युटिलिटी पेटंट प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाने तिची ‘परिवहन दूत’ म्हणून घोषणा केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, समाजहिताच्या उद्देशाने विकसित केलेल्या या प्रकल्पासाठी साईश्रद्धाने कोणतेही मानधन किंवा आर्थिक मोबदला स्वीकारलेला नाही. त्यामुळे तिच्या तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचेही विशेष कौतुक होत आहे.
संजीवनी परिवाराकडून साईश्रद्धाचा गौरव
साईश्रद्धाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांच्या हस्ते साईश्रद्धाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. अजयकुमार ठाकूर, एच.ए.जी. डॉ. रावसाहेब शेंडगे, प्राचार्या प्रा. रेखा साळुंके, प्रा. मोहन सोनवणे, प्रा. वैशाली क्षीरसागर, प्रा. प्रियांका नरोडे आणि प्रा. निवृत्ती अष्टेकर उपस्थित होते.
‘ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे द्योतक’
डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या, “साईश्रद्धा सालमुठे हिचे यश हे केवळ तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाचे प्रतीक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या अमर्याद क्षमतेचे द्योतक आहे. संजीवनीमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवोपक्रमशीलता, संशोधन वृत्ती, तंत्रज्ञान कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी पोषक वातावरण दिले जाते. साईश्रद्धाने विकसित केलेले समाजोपयोगी सॉफ्टवेअर आणि त्यासाठी मिळालेले पेटंट हे तिच्या जिद्दीचे, प्रतिभेचे आणि संजीवनीच्या शैक्षणिक संस्कारांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
