कोपरगाव | वृत्तवेध :
गोदावरी नदीपात्रातून शासकीय मालकीच्या वाळूचा बेकायदा उपसा करून वाहतूक करण्याचा प्रयत्न कोपरगाव शहर पोलिसांनी उधळून लावला. डाऊच खुर्द गावच्या शिवारात केलेल्या कारवाईत पोलिसांनी वाळूसह पाच ट्रॅक्टर जप्त केले असून, या वाहनांची एकूण किंमत सुमारे १६ लाख ५ हजार रुपये आहे. कारवाईदरम्यान एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर अन्य चार ट्रॅक्टरवरील चालक नदीपात्रात वाहने सोडून पसार झाले.
गोदावरीच्या पात्रात सुरू होता वाळू उपसा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३५ वाजता डाऊच खुर्द गावच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. विशाल ठकीनाथ लव्हाटे (वय २६, रा. चांदगव्हाण, ता. कोपरगाव) हा शासकीय मालकीच्या वाळूचा अनधिकृतपणे उपसा करून स्वतःच्या फायद्यासाठी वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना आढळलेपोलिसांची चाहूल लागताच अन्य चार ट्रॅक्टरवरील चालकांनी आपापली वाहने नदीपात्रातील काटवणात सोडून पळ काढला.
पाच ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी एकूण पाच विनानंबर ट्रॅक्टर जप्त केले. त्यापैकी एका ट्रॅक्टरला लाल रंगाची ट्रॉली असून त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकत्रित किंमत १६ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिस अहवालात नमूद आहे.
एकाला ताब्यात; चौघांचा शोध सुरू
या प्रकरणी विशाल लव्हाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य चार ट्रॅक्टरवरील चालक-मालकांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर जाधव यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर जाधव करीत आहेत.
वृत्तवेधचा थेट मुद्दा
गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. नदीपात्रातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी अशा कारवायांमध्ये सातत्य राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
