कोपरगाव | वृत्तवेध :
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव रेल्वे स्थानकावर दररोज दीड लाखांहून अधिक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरामुळे कोपरगाव हे भाविकांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याने कुंभमेळ्यापूर्वी रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कुंभमेळा आयुक्त शेखरजी सिंग यांची नाशिक येथे भेट घेऊन विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आ. काळे यांनी आयुक्तांना सविस्तर लेखी निवेदन देत कोपरगाव रेल्वे स्थानकावर भविष्यात निर्माण होणाऱ्या गर्दीचा आणि सुविधांवरील वाढत्या ताणाचा मुद्दा मांडला. सिंहस्थ सुरू होण्यापूर्वीच प्रस्तावित कामे पूर्ण झाली नाहीत तर भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने कामांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पाण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्याची मागणी
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थानकावरील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी २.५० लाख लिटर क्षमतेची आरसीसी पाण्याची टाकी आणि दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहेयासोबतच स्वतंत्र पंपरूम, दोन बोअरवेल्स, आवश्यक पाइपलाइन आणि जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.
कचरा अन् पाणी व्यवस्थापनावरही भर
कुंभमेळ्याच्या काळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी १५ केएलडी क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आ. काळे यांनी अधोरेखित केली.
प्लॅटफॉर्मवर सुविधा वाढवा!
स्थानकाच्या सुशोभीकरणासह वातानुकूलित व स्लीपर क्लास प्रतीक्षालयातील फरशा बदलणे, प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वर अतिरिक्त सशुल्क स्वच्छतागृहे उभारणे आणि प्लॅटफॉर्मवर पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानक इमारतींचे रंगकाम, फॉल्स सीलिंग आणि नवीन फरशीकाम करण्यासोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
१० खाटांची निरीक्षण इमारत अन् स्वतंत्र वॉर्ड
सिंहस्थ काळातील संभाव्य आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन १० खाटांची स्वतंत्र निरीक्षण इमारत उभारावी, तसेच २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेले पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
‘कोपरगाव हे भाविकांचे महत्त्वाचे प्रवेशद्वार’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात कोपरगाव रेल्वे स्थानक हे भाविकांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव मिळण्यासाठी प्रस्तावित कामांना प्राधान्याने निधी मिळणे आवश्यक असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद
आ. काळे यांच्या मागणीवर कुंभमेळा आयुक्त शेखरजी सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कुंभमेळा नियोजनाच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
