कोपरगावात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण; भरपावसात राजकीय एकजूट, युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश
कोपरगाव | वृत्तवेध :
“अण्णाभाऊ साठे हे केवळ लोकशाहीर नव्हते, तर कष्टकरी, शोषित, पीडित आणि वंचितांच्या वेदनांना शब्द देणारे महान साहित्यिक होते. माणूस उंचीने नव्हे, तर कर्तृत्व, कष्ट आणि स्वाभिमानाने मोठा होतो. युवकांनी व्यसनांची नव्हे, तर व्यायाम, कर्तृत्व आणि परिश्रमाची स्पर्धा करावी,” असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
कोपरगाव नगरपालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सात फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे, नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
‘अण्णाभाऊंचे विचार आचरणात आणा’
अवघे दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या कर्तृत्वाने साहित्यविश्वात अमीट ठसा उमटविला. कष्टकरी माणसाचा आवाज त्यांनी साहित्याच्या माध्यमातून बुलंद केला. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला असून परदेशातील विद्यापीठांमध्येही त्यांच्या कार्याचा अभ्यास केला जातो.
“कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीच नाही. महापुरुषांच्या जयंती केवळ उत्सवापुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे आचरण झाले पाहिजे,” असे महाजन म्हणाले. युवकांनी गुटखा, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहावे. कठोर परिश्रम, सुसंस्कार आणि स्वाभिमानाने जगणारी पिढी घडविणे हीच अण्णाभाऊंना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
‘कोपरगावच्या रस्त्यांकडे आता लक्ष देतो!’
कोपरगावच्या विकासासाठी नदीघाट सुशोभीकरण, पूरसंरक्षण भिंत आदी कामांचे प्रस्ताव पाठवावेत. प्रस्ताव प्राप्त होताच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
कोपरगावच्या रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना महाजन यांनी थेट शब्दांत प्रशासनाला टोला लगावला. “महाराष्ट्रात जिकडे पाहावे तिकडे रस्ते झालेले दिसतात; मग कोपरगावच का अपवाद? इथले रस्ते पाहिल्यानंतर घोडे कुठे अडले हे लक्षात आले. काळजी करू नका, आता मी कोपरगावच्या रस्त्यांकडे स्वतः लक्ष देतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘महापुरुषांना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या’
आमदार विवेक कोल्हे यांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करताना, “महापुरुषांना केवळ डोक्यावर घेऊन मिरवणुका काढण्यात अर्थ नाही; त्यांचे विचार डोक्यात घेण्याची आजच्या पिढीला गरज आहे,” असा संदेश दिला.
कोपरगावात अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्यामागे अनेक दशकांचा संघर्ष असल्याचे सांगत त्यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि समाजबांधवांच्या योगदानाचा उल्लेख केला. अण्णाभाऊंचे साहित्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते. माणूस हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. रशियाच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून त्यांनी महाराष्ट्राचा आवाज जगभर पोहोचविल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.
गोदावरी नदीकाठचा घाट, पूरसंरक्षण भिंत, पुणतांबा घाटाचा विकास तसेच पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याची दीर्घकालीन मागणी त्यांनी महाजन यांच्यासमोर मांडली. समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या सिंचनाला मोठा फायदा होईल, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
‘स्मारक केवळ पुतळा नाही, प्रेरणास्थळ’
आमदार आशुतोष काळे यांनी अण्णाभाऊंचे स्मारक हे कर्तृत्व सिद्ध करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थळ असल्याचे सांगितले. स्मारकासाठी अनेक वर्षे संघर्ष करणाऱ्या समाजबांधवांचे त्यांनी अभिनंदन केले.
“स्मारक सर्व समाजासाठी खुले व्हावे आणि अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा सर्वांना मिळावी, एवढाच माझा स्वच्छ हेतू होता. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न केले,” असे काळे यांनी स्पष्ट केले.
सचिन साठेंचा आरक्षण वर्गीकरणावर एल्गार
अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी अण्णाभाऊंचे साहित्य हे वंचित, शोषित आणि कष्टकरी माणसाच्या दुःखाचा आवाज असल्याचे सांगितले. विविध समाजघटकांतील सामान्य माणसाला अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचा नायक बनविले.
“अण्णाभाऊंच्या विचारांचे खरे वारसदार व्हायचे असेल तर वंचितांना न्याय मिळवून देण्याची लढाई लढली पाहिजे,” असे सांगत त्यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाचा मुद्दा महाराष्ट्रात मार्गी लावण्याची मागणी केली.

चौकट : भरपावसातही अण्णाभाऊंच्या विचारांना सलाम!
पुतळ्याचे अनावरण होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र पावसाची तमा न बाळगता नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. भरपावसातील ही उपस्थिती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
चौकट : राजकीय मतभेद बाजूला
अण्णाभाऊंच्या लोकार्पण सोहळ्यात विविध राजकीय प्रवाहांतील नेते एकाच व्यासपीठावर आले. बिपिनदादा कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे आणि सचिन साठे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. खासदार वाकचौरे यांनीही मतदारसंघातील विकासकामांच्या मागण्या महाजन यांच्याकडे मांडल्या.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले, तर विनोद राक्षे यांनी आभार मानले.

