कार्ड मिळाले नाही म्हणून अर्ध्या तिकिटाची सवलतही बंद; कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५० टक्के पात्र लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत, आ. आशुतोष काळे यांची परिवहन मंत्र्यांकडे मुदतवाढीची मागणी
कोपरगाव वृत्त वेध:
सवलत जाहीर झाली; पण सवलतीचे कार्डच वेळेत मिळाले नाही… मग त्याचा आर्थिक भुर्दंड लाभार्थ्यांनी का सोसावा? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेत अपुरी यंत्रणा, नेटवर्कचा घोळ आणि अंगठ्याचे ठसे न जुळण्याच्या तक्रारींमुळे कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५० टक्के पात्र लाभार्थी अद्याप कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.
कार्ड नाही म्हणून सवलतही नाही! परिणामी पूर्वी अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आता पूर्ण भाडे मोजावे लागत असल्याने त्यांच्या खिशावर थेट अतिरिक्त भार पडत आहे.
‘कार्ड मिळेपर्यंत सवलत तरी सुरू ठेवा!’
या पार्श्वभूमीवर एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि कार्ड प्रत्यक्ष मिळेपर्यंत ज्येष्ठ नागरिक व महिलांना पूर्वीप्रमाणेच एसटी प्रवास सवलत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू आहे. अनेकांनी नोंदणी केली असली तरी ग्रामीण भागात मोठ्या संख्येने पात्र लाभार्थी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत.
सवलत कागदावर; प्रत्यक्षात पूर्ण भाडे!
१ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य झाल्याने कार्ड नसलेल्या पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पूर्ण तिकीट काढावे लागत आहे.
यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची अडचण वाढली आहे. नोकरी, शिक्षण, उपचार, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी नियमित शहराकडे ये-जा करणाऱ्या महिलांना पूर्वीच्या सवलतीच्या तुलनेत आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सवलत देण्याची घोषणा झाली; मात्र ती मिळविण्यासाठी आवश्यक कार्डच वेळेत मिळत नसेल, तर कार्डच्या विलंबाची किंमत लाभार्थ्यांनी का मोजायची? हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
अंगठा जुळत नाही, नेटवर्क साथ देत नाही!
एनसीएमसी कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी समोर येत आहेत.
- अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याच्या तक्रारी
- काही केंद्रांवर नेटवर्कची समस्या
- नोंदणीसाठी अपुरी यंत्रणा
- कार्ड तयार होण्यास विलंब
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना वारंवार केंद्रावर हेलपाटे
या अडचणींमुळे पात्र असूनही सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ ज्येष्ठ नागरिक आणि महिलांवर आली आहे.
ग्रामीण महिलांची दुहेरी कोंडी
ग्रामीण भागातील अनेक महिला नोकरी, शिक्षण, उपचार आणि शासकीय कामांसाठी एसटीवर अवलंबून आहेत. त्यांचा रोजचा प्रवास आधीच वेळखाऊ असताना केवळ एनसीएमसी कार्डसाठी वारंवार नोंदणी केंद्रावर जाणे शक्य होत नाही.
त्यातच एखाद्या वेळी नेटवर्क बंद, अंगठा न जुळणे किंवा यंत्रणा उपलब्ध नसणे अशा कारणांमुळे काम झाले नाही, तर पुन्हा केंद्रावर जाण्याची वेळ येते.
कार्डची प्रक्रिया प्रशासनाच्या नियंत्रणात; मग कार्ड न मिळाल्याची शिक्षा लाभार्थ्यांना का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
आ. काळे यांचा परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा
एनसीएमसी कार्डची नोंदणी व वाटप प्रक्रिया सुरू असली तरी तांत्रिक आणि वैयक्तिक अडचणींमुळे हजारो पात्र लाभार्थ्यांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी पुरेसा अतिरिक्त कालावधी द्यावा आणि कार्ड प्रत्यक्ष मिळेपर्यंत पूर्वीची प्रवास सवलत कायम ठेवावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
वृत्तवेध विशेष | ‘सवलत’ कुठे गेली?
एकीकडे सरकार सवलत देत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे कार्ड न मिळाल्याने पात्र प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जात आहे. ही विसंगती दूर करण्याची गरज आहे.
एनसीएमसीची यंत्रणा सक्षम होईपर्यंत सवलत बंद करण्याऐवजी मुदतवाढ आणि अंतरिम दिलासा देणे हा अधिक व्यवहार्य मार्ग ठरू शकतो.
कार्ड मिळाले नाही म्हणून सवलतही गेली, तर ‘सवलती’चा लाभ नेमका कोणाला? हा प्रश्न आता एसटी प्रशासन आणि शासनाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
