गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून यंत्रणेची पाहणी; शहर पोलीस ठाण्यात २४ तास कंट्रोल रूम
कोपरगाव वृत्त वेध:
शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला आता डिजिटल बळ मिळाले आहे. शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी तब्बल ४८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांना जोडलेली लाऊडस्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील कंट्रोल रूममधून केले जात आहे. ही कंट्रोल रूम २४ तास कार्यरत राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून ती व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री केली.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पो कॉ. गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे,पोहेकॉ. जालिंदर तमनर, पोकॉ.तुषार कानवडे, महिला पोकॉ.विजया दिवे पोलीस हवालदार इरफान शेख यांनी विविध ठिकाणी जाऊन यांनी यंत्रणेची तपासणी केली.
गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, विघ्नेश्वर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, बाबा चौक, येवला नाका, साई कॉर्नर, जुना टाकळी नाका, गोकुळनगरी चौक, शनी चौक, आचारी हॉस्पिटल चौक, १०५ हनुमाननगर चौक, गांधीनगर चौक, संभाजी महाराज सर्कल, गोदावरी लहान पूल, गोदावरी मोठा पूल, के. जे. सोमय्या कॉलेज चौक, तहसीलदार चौक यासह शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
गुन्हेगारांवर नजर; संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई
सीसीटीव्हीमुळे शहरातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांची थेट नजर राहणार आहे. चोरी, मारामारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, गर्दी किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती कंट्रोल रूममधून तात्काळ घेता येणार आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर तपास करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक पोलिसिंगलाही बळ मिळणार आहे.
चौकातच पोलिसांचा ‘आवाज’!
या यंत्रणेतील लाऊडस्पीकर हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वाहतूक कोंडी, चुकीचे पार्किंग किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार आढळल्यास पोलिस कंट्रोल रूममधून संबंधित भागातील नागरिकांना थेट सूचना देता येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीतही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
पालिकेलाही सार्वजनिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि विविध जनजागृती मोहिमांसाठी या यंत्रणेचा उपयोग करता येऊ शकतो.
२४ तास डिजिटल पहारा
४८ सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकर आणि २४ तास कार्यरत कंट्रोल रूम यामुळे कोपरगाव शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे. मात्र, ही यंत्रणा सातत्याने कार्यरत ठेवणे, नियमित देखभाल करणे आणि कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या माहितीवर तातडीने कारवाई करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कोपरगावच्या चौकाचौकात आता कॅमेऱ्यांची नजर आणि पोलिसांचा थेट आवाज राहणार असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण होण्यासोबतच वाहतूक शिस्तीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
