कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेती आणि जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्याची पाणी अडविण्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील विविध बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी एकूण ७ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यात हिंगणी बंधाऱ्यासाठी ३५ नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या होत्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० फळ्या उपलब्ध झाल्याने दुरुस्तीच्या कामाला वेग मिळाला आहे. बंधाऱ्याची संरचनात्मक दुरुस्ती व मजबुतीकरण पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यास तसेच परिसरातील जलसाठा वाढविण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या हिंगणी बंधाऱ्याला कोपरगावच्या जलव्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच भूजल पातळी सुधारण्यास आणि परिसरातील जलस्रोत बळकट होण्यास मदत होऊ शकते.
सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून त्याचा शेतीसाठी प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. मंजूर निधीतून मतदारसंघातील इतर बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामेही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.
हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी जपणे, शेतीला बळ देणे आणि कोपरगावच्या विकासाला गती देणे, हा या कामामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
