कोपरगाव : निळवंडे कालव्याच्या पाण्याचा परिसरातील बंधारे व पाझर तलाव भरण्यासाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने मंगळवारी (दि. १७) त्यांनी निळवंडे कालव्याच्या वितरिका क्र. ४च्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
निळवंडे कालवा ते मंगलमूर्ती लॉन्स या मार्गावरील तसेच टेल राईट वितरिका ते खोकड विहीर पॉईंटपर्यंतची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या. धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद आणि शहापूर परिसरातील बंधारे व पाझर तलाव निळवंडे कालव्याच्या पाण्याने भरता यावेत, यासाठी मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यानुसार वितरिका क्र. ४वर मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, कालव्याशी जोडणीचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
दरम्यान, एका ठिकाणी डाळिंबाच्या बागेतून पाईपलाइन टाकण्याचे काम प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे काम विनाविलंब पूर्ण करावे, असे निर्देश आमदार काळे यांनी दिले. तसेच टेल राईट वितरिकेतून खोकड विहीर पॉईंटपर्यंत सुमारे २०० मीटर पाईपलाइन टाकून व्हॉल्व्ह बसविण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ही कामे पूर्ण झाल्यानंतर निळवंडे कालव्याचे पाणी परिसरातील बंधारे व पाझर तलावांमध्ये सोडण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. त्यामुळे धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी कृषी विभागाच्या सायली बेंडकुळे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
