मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; इशारे देऊनही अतिक्रमणे न हटविणाऱ्यांना नगरपरिषदेचा दणका
वृत्तवेध विशेष | कोपरगाव
रस्ते नागरिकांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी? गेल्या काही महिन्यांपासून कोपरगावकरांच्या मनात घोळणाऱ्या या प्रश्नाला नगरपरिषदेने गुरुवारी थेट बुलडोझरने उत्तर दिले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी पसरलेली हातगाड्या, टपऱ्या, अनधिकृत शेड, कट्टे, ओटे तसेच कच्च्या-पक्क्या बांधकामांची अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषदेने धडक मोहीम राबविली. या कारवाईत सुमारे १२० ते १५० अतिक्रमणे निष्कासित करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेने दिली.
‘पहिले इशारे, मग बुलडोझर’
अतिक्रमणधारकांना कारवाईची कोणतीही कल्पना नव्हती, असे चित्र नव्हते. नगरपरिषदेने ३१ ऑगस्ट रोजी वर्तमानपत्रातून जाहीर सूचना देऊन अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर १ आणि २ सप्टेंबर रोजी वाहनाद्वारे शहरात फिरून सूचना देण्यात आल्या. गुरुवारी मोहीम सुरू होण्यापूर्वीही पुन्हा अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे कायम ठेवणाऱ्यांवर अखेर कारवाईचा हातोडा पडला.
७५ ते ८० कर्मचारी; दोन जेसीबी मैदानात
कारवाईसाठी नगरपरिषदेच्या वसुली, बांधकाम, नगररचना आणि आरोग्य विभागातील सुमारे ७५ ते ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन पथके तैनात करण्यात आली होती. महिला कर्मचाऱ्यांचाही आवश्यकतेनुसार सहभाग होता. अतिक्रमण हटविण्यासाठी दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन डंपर आणि एक गुरखा गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच अतिक्रमणधारकांमध्ये धावपळ सुरू झाली.
या मार्गांवर कारवाईचा धडाका
स्वामी समर्थ मंदिर ते येवला नाका, बाबा चौक ते संभाजी महाराज सर्कल ते तहसील कार्यालय, गुरुद्वारा रोड आणि धारणगाव रोड या प्रमुख मार्गांसह विविध अंतर्गत भागांतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. हातगाड्या, टपऱ्या, शेड, ओटे आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
पोलीस बंदोबस्तामुळे कारवाई निर्विघ्न
मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नगररचनाकार किरण जोशी आणि सहायक नगररचनाकार अश्विनी पिंगळे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. श्रीकांत कुऱ्हाडे, अमित राठोड, रुपाली सातपुते, गणेश काकडे, गणेश लकारे तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी एकनाथ निंबोरे यांच्या सहभागामुळे मोहीम अनुचित प्रकार न घडता पार पडली.
वृत्तवेधचा सवाल : बुलडोझर थांबला तर अतिक्रमण पुन्हा उभे राहणार का?
अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली, रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले; मात्र खरी कसोटी आता सुरू झाली आहे.
कारण कोपरगावकरांना यापूर्वीही मोहीम, कारवाई आणि त्यानंतर पुन्हा त्याच जागी उभ्या राहिलेल्या टपऱ्या-शेडचा अनुभव आहे. त्यामुळे एक दिवसाचा बुलडोझर नव्हे, तर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त रस्ते हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
हटविलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण झाले तर कारवाईचा सारा गाजावाजा व्यर्थ ठरेल. त्यामुळे कारवाईनंतर संबंधित जागांवर नियमित देखरेख, पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर तातडीची कारवाई आणि कोणताही भेदभाव न करता सातत्यपूर्ण मोहीम राबविणे आवश्यक आहे.
आता निशाण्यावर बँक रोड आणि गांधीनगर रोड!
नगरपरिषदेने मोहीम येथेच थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँक रोड, गांधीनगर रोड तसेच शहरातील अन्य भागांतील अतिक्रमणेही हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.
अतिक्रमणमुक्त रस्ता हा नागरिकांचा हक्क आहे; सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून ती कोणाचीही मक्तेदारी होऊ शकत नाही. गुरुवारची कारवाई या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. मात्र, आता कोपरगावकरांची नजर पुढील कारवाईकडे लागली आहे.
बुलडोझरने अतिक्रमण हटविले; आता प्रशासनाने ‘पुन्हा अतिक्रमण होणार नाही’ याची हमी देण्याची वेळ आली आहे!
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
