वृत्तवेध ऑनलाईन | कोपरगाव
कोपरगाव शहर व तालुक्यातील मटका आणि अवैध जुगाराचे धंदे तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. यासंदर्भात शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अवैध धंद्यांमुळे सामाजिक प्रश्न गंभीर
कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध भागांत मटका व अवैध जुगाराचे प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने निवेदनातून केला आहे. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना फटका बसत असून, कौटुंबिक वाद आणि सामाजिक समस्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. काही अवैध व्यावसायिक पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचा प्रचार करीत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या दाव्यांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
तीन प्रमुख मागण्या
कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील मटका आणि जुगाराचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, संबंधित मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि कारवाईत पारदर्शकता ठेवून जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दृढ करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
तसेच स्थानिक आमदार व खासदारांनी अवैध धंद्यांविरोधात स्पष्ट भूमिका मांडावी आणि अशा प्रकारांना कोणताही पाठिंबा नसल्याचे जाहीर करावे, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन
येत्या सात दिवसांत शहर व तालुका परिसरातील अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाई झाली नाही, तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे आंदोलनाची तारीख जाहीर करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख गगन हाडा, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्मा जावळे, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, विधानसभा प्रमुख महेश कुलकर्णी, भावेश थोरात, विकास गाडे, नंदू निकम, निखिल क्रंकाले, आबासाहेब पवार, पियूष सैदाने, राहुल हाडा, विनय टाक, ओम पवार, शांतनु चावरे, वरुण टाक, याकूब शेख आणि कुणाल चावरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रतीमुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,ना. राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, अहिल्यानगर,आमदार आशुतोषदादा काळेआमदार विवेक कोल्हे यांना देण्यात आले आहे
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
