मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द; कोल्हे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
कोपरगाव | वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ लाख ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. या देणगीचा धनादेश मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आमदार विवेक कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हा धनादेश प्रदान केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न
राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही मदत देण्यात आली.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे संजीवनी परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
फडणवीसांकडून उपक्रमाचे कौतुक
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजीवनी परिवाराचे कौतुक केले. सामाजिक जाणिवेतून मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी कोल्हे परिवार आणि संजीवनीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
शंकरराव कोल्हे यांची परंपरा पुढे
स्व. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी रुजविलेल्या सहकार, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेच्या परंपरेचा वारसा पुढे नेत संजीवनी परिवाराने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. शिक्षण, सहकार आणि उद्योग क्षेत्राबरोबरच संकटग्रस्त घटकांना मदत करण्याच्या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाची ही भूमिका अधोरेखित होत आहे.
चौकट : सत्काराऐवजी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन
नवनियुक्त जिल्हा बँक संचालक बिपीनदादा कोल्हे यांनीही सत्कार स्वीकारण्याऐवजी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन समर्थकांना केले होते. रोख रक्कम तसेच धान्याच्या स्वरूपात मदत करण्याच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात संजीवनी आणि कोल्हे परिवाराकडून विविध माध्यमांतून मदतीचा हात पुढे केला जात असल्याचे दिसून येत आहे.
वृत्तवेध ऑनलाईन : व्यक्तीपेक्षा प्रश्न महत्त्वाचा.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
