कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन :
आत्मनिर्भर भारताच्या विकासाला प्राधान्य देत केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून तळेगाव दाभाडे (पुणे) येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनर्निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे साखर कारखान्यांसाठी आवश्यक मशिनरी निर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.

रविवारी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. सहकारमहर्षी व माजी सहकारमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या पुनर्निर्माणामुळे त्यांच्या सहकार व स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विचारांना नवी दिशा मिळणार असल्याचे आमदार कोल्हे यांनी सांगितले.
स्व. शंकरराव कोल्हेंचा पुढाकार
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आणि यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार चळवळीचा पाया घातला. त्याच विचारातून स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश-विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करून १९७४ मध्ये नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना केली होती.
साखर कारखान्यांना लागणारी मशिनरी तसेच कमी खर्चात अधिक कार्यक्षम स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून या संस्थेने राज्यासह देश-विदेशातील साखर उद्योगाला मशिनरीचा पुरवठा केला. मात्र, मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना संस्थेला करता न आल्याने तळेगाव दाभाडे येथील सुमारे ११० एकर क्षेत्रावरील ही संस्था २०११ मध्ये बंद पडली.
स्व. शंकरराव कोल्हे यांनी २०१६ पर्यंत संस्थेच्या पुनर्निर्माणासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाल्याने या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला.

आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठपुरावा
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग पुन्हा सुरू करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे विशेष पाठपुरावा केल्याचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
पुनर्निर्माण प्रकल्पानंतर येथे साखर कारखान्यांसाठी लागणारे बॉयलर, इथेनॉल संयंत्रे, कंटेनर तसेच अन्य मशिनरीचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे साखर उद्योगाला आवश्यक यंत्रसामग्रीच्या निर्मितीला चालना मिळून सहकार क्षेत्र अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे कोल्हे यांनी सांगितले.
सहकार क्षेत्राच्या विस्तारावर भर
केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून देशातील सुमारे ८ लाख सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचे जाळे अधिक विस्तारित करण्याच्या या प्रयत्नांचा आपल्याला अभिमान असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे सोने करून नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्था सहकार क्षेत्रात पुन्हा नावारूपाला आणण्यासाठी जबाबदारीने काम करू, असा विश्वास आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : पत्रकार राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
