कोपरगाव : शेतीतील वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर ५० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या शेतीच्या विविध कामांसाठी डिझेल ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. डिझेलच्या किमती आणि त्यावरील खर्चामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन खर्चात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर वाढविल्यास इंधनावरील खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळेल, असे आ. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना खरेदी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या योजनेत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका आ. कोल्हे यांनी मांडली.
यासोबतच अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कृषी-उद्योग विभागाच्या समन्वयातून योजना
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी कृषी विभाग आणि उद्योग विभाग यांच्या समन्वयातून स्वतंत्र योजना तयार करावी. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासोबतच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनाही प्रोत्साहन देण्यात यावे, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे या उद्देशाने राज्य शासनाने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर ५० टक्के अनुदान देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आ. विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
