कोपरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील आर. जे. भागवत घर ते ज्ञानेश्वर घर ते पत्रकार मोबीन खान घर, खडकी रोड या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामावरून कोल्हे आणि काळे गट आमनेसामने आले आहेत. रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेल्या निधीचे श्रेय नेमके कोणाचे, यावरून कोल्हे गटाचे राहुल खरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
कोपरगाव नगरपरिषदेच्या नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २६ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, काम सुरू होताच त्याच्या निधी आणि श्रेयावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
‘प्रलंबित विकासकामांना आता गती’ – राहुल खरात
कोल्हे गटाचे राहुल खरात यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेकडून शहरातील प्रलंबित विकासकामांना गती दिली जात असल्याचा दावा केला. मागील काळात निधी उपलब्ध असतानाही रस्त्यांची कामे वेळेत झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना दोन-तीन वर्षे रस्त्यांच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.
विकासकामे प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्याऐवजी विरोधकांकडून राजकीय आकसातून टीका केली जात असल्याचा आरोपही खरात यांनी केला.
“दुसऱ्यांवर बोट दाखविण्यापेक्षा काळे गटाच्या मंडळींनी स्वतःच्या कार्यकाळातील कामांचा हिशेब जनतेसमोर मांडावा,” असे खरात यांनी म्हटले.
शहरातील अतिक्रमित घरांचा प्रश्न नियमाकुल करण्यासाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याचा दावाही खरात यांनी केला.
‘निधी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून’ – शैलेश साबळे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी राहुल खरात यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संबंधित रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याचा दावा त्यांनी केला.
“नगराध्यक्षांनी प्रशासन काळात मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन करून स्वतःचे श्रेय घेऊ नये,” अशी टीका साबळे यांनी केली.
कोपरगाव नगरपालिका सत्ताधारी गटाकडून आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात सध्या सुरू असलेली अनेक विकासकामे प्रशासन काळात मंजूर झालेली असून त्यासाठी आमदार काळे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा साबळे यांनी केला.
शहरातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून अनेक कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, असे साबळे यांनी सांगितले.
‘स्वतःची अवस्था सुधारा, मग इतरांना सल्ले द्या’ – खरात
शैलेश साबळे यांच्या भूमिकेवर राहुल खरात यांनीही पलटवार केला. प्रभागातील नागरिकांनी तक्रारींसाठी फोन केल्यास “मला कशाला सांगता, तुम्ही नगरपालिकेत जा,” अशी उत्तरे दिली जात असल्याचा दावा खरात यांनी केला.
“स्वतःची अवस्था सुधारा आणि मग इतरांना सल्ले द्या,” असा खोचक टोला त्यांनी साबळे यांना लगावला.
रस्त्याच्या कामावरून श्रेयवाद चिघळला
या संपूर्ण वादात रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी निधी कोणाच्या पाठपुराव्यातून मंजूर झाला आणि सध्याच्या कामाचे श्रेय कोणाला द्यायचे, हा मुख्य मुद्दा बनला आहे. एका बाजूने नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात झाल्याचा दावा केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूने संबंधित कामासाठी निधी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या दाव्यांबाबत निधी मंजुरीचा आदेश, प्रशासकीय मंजुरी आणि कामाची निविदा प्रक्रिया यातील अधिकृत कागदपत्रांवरूनच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
