रस्ते, गटारे, वीज व पाणीपुरवठ्याच्या कामांना मिळणार चालना
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वाड्या-वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा समाजकल्याण विभागाच्या ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे’ या योजनेंतर्गत मतदारसंघातील २९ गावांमधील ६१ वाड्या-वस्त्यांतील ७० विकासकामांसाठी ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या निधीतून रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, बंदिस्त गटारे, पेव्हिंग ब्लॉक, रस्ते मजबुतीकरण, डांबरीकरण, मलनिस्सारण तसेच सार्वजनिक शौचालय आदी कामे केली जाणार आहेत.
२९ गावांतील वाड्या-वस्त्यांना लाभ
आंचलगाव, बोलकी, ब्राह्मणगाव, कान्होबावाडी, काकडी, कुंभारी, करंजी, कोळपेवाडी, कासली, चासनळी, चांदेकसारे, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, धोत्रे, धारणगाव, तळेगाव मळे, मनेगाव, मढी खुर्द, मंजूर, मळेगाव थडी, जवळके, जेऊर कुंभारी, सुरेगाव, शिंगणापूर, वेस-सोयगाव, डाऊच खुर्द, रवंदे, टाकळी आणि वेळापूर आदी गावांतील विविध वाड्या-वस्त्यांना या विकासकामांचा लाभ मिळणार आहे.
रस्ते, वीज आणि पाणीपुरवठ्याला प्राधान्य
आंचलगाव येथील जाधव वस्ती वीजपुरवठा, बोलकी येथील इंदिरानगरमध्ये काँक्रीट रस्ता व बंदिस्त गटार, ब्राह्मणगाव येथे काँक्रीट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक, काकडीतील ठोंबरे-बोरुडे वस्ती पाणीपुरवठा, कुंभारीतील बंदिस्त गटार, करंजीतील पेव्हिंग ब्लॉक, कोळपेवाडीतील काँक्रीट रस्ता व वीजपुरवठा, कासलीतील वीजपुरवठा व काँक्रीट रस्ता अशा कामांचा समावेश आहे.
सुरेगाव येथे अंतर्गत रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि मलनिस्सारणाची कामे, शिंगणापूर येथे पेव्हिंग ब्लॉक व काँक्रीट रस्ते, वेस-सोयगाव येथील आंबेडकरनगरमध्ये काँक्रीट रस्ता, भीमनगरमध्ये सार्वजनिक शौचालय व वीजपुरवठा, डाऊच खुर्द येथे पाणीपुरवठा व रस्ता खडीकरण, रवंदे येथे काँक्रीट रस्ता, टाकळी येथील इंदिरानगरमध्ये वीजपुरवठा आणि वेळापूर येथे काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना मिळणार गती
या विकासकामांमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील रस्ते, गटारे, वीज आणि पाणीपुरवठ्याच्या मूलभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार आशुतोष काळे यांनी आभार मानले.
यापूर्वीही विविध योजनांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विकासकामांच्या प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
दरम्यान, २९ गावांतील वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
