कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठ्यासह सौरपंपासाठी १० टक्के अनुदानाची मागणी
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरी, बोअरवेल आणि विद्युत पंपांची वीजबिले संपूर्ण माफ करावीत. तसेच या योजनांना कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा करून शेतकऱ्यांप्रमाणे केवळ १० टक्के अनुदानावर सौरपंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांसाठी विहिरी, बोअरवेल तसेच पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या पंपांच्या वीजबिलांचा मोठा आर्थिक भार ग्रामपंचायतींवर पडत आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असताना इतर मूलभूत नागरी सुविधांवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने वीजबिले भरणे अनेक ग्रामपंचायतींसाठी अडचणीचे ठरत असल्याचे आ. कोल्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम
वीजबिले थकीत राहिल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा योजना बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असल्याने पाणीपुरवठा योजनांचा वीजखर्च कमी करण्यासाठी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धोत्रेसह ग्रामपंचायतींची मागणी
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतींनीही पाणीपुरवठा योजनांची वीजबिले संपूर्ण माफ करावीत, कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांप्रमाणे १० टक्के अनुदानावर सौरपंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना ही सवलत लागू करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती आ. विवेक कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
