कालव्यांचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मागणी; १९ हजार ७११ शेतकरी अद्याप अग्रीम मदतीच्या प्रतीक्षेत
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
कोपरगाव : संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २८) झालेल्या ऑनलाइन टंचाई आढावा बैठकीत आ. काळे यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले. त्यांच्या मागण्यांवर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गोदावरी उजवा व डावा कालवा, पालखेड कालवा तसेच निळवंडे कालव्याचे सुरू असलेले आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे, अशी आग्रही मागणी आ. काळे यांनी केली. गावांतील तलाव, बंधारे तसेच पाणीपुरवठा योजनांशी संबंधित जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालव्यांचे आवर्तन बंद करू नये, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही त्यांनी केली.
१९ हजार ७११ शेतकरी अग्रीम मदतीपासून वंचित
दुष्काळी परिस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिशेतकरी पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचा प्रश्नही आ. काळे यांनी बैठकीत उपस्थित केला. पंचनाम्यानुसार मतदारसंघातील ६१ हजार ३९२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४१ हजार ६८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली असून, १९ हजार ७११ शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना उर्वरित मदत तातडीने मिळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाला निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली.
२२ गावांच्या पाणी योजनांच्या वीजजोडण्या रखडल्या
जलजीवन मिशनअंतर्गत २२ गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीचे प्रस्ताव पंचायत समिती आणि महावितरणकडे प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष वीजजोडण्या पूर्ण केल्यास संबंधित गावांतील पाणीपुरवठा योजना सुरू होऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. काळे यांनी स्पष्ट केले.
अपूर्ण योजनांसाठी टंचाई आराखड्यातून निधीची मागणी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठी टंचाई आराखड्यातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
सुरेगाव येथे ६०० मीटर पाइपलाइन व तळ्यात कागद टाकणे, धारणगाव येथे १०० मीटर पाइपलाइन, रोड क्रॉसिंग, पिचिंग व तळ्यात कागद टाकणे, तसेच पुणतांबा येथे ४०० मीटर पाइपलाइन टाकण्याची कामे पूर्ण झाल्यास या गावांच्या पाणीपुरवठा योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरू करता येतील. त्यामुळे या कामांना तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आ. काळे यांनी केली.
पाणी, शेतकरी मदत आणि योजनांना प्राधान्य
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांना प्रलंबित आर्थिक मदत आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पूर्तता या तीनही बाबींना प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा आग्रह आ. आशुतोष काळे यांनी बैठकीत धरला.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
