१४ वर्षांखालील संघाची दमदार कामगिरी; राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कल्याणी वावधानेचा सहभाग
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
कोपरगाव : बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत राष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. या दमदार कामगिरीच्या जोरावर शाळेच्या पाच हॉकीपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षांखालील गटातील अभिषेक चौधरी, ओंकार डोंगरी, शहाजी घुमरे (नाशिक) आणि रणवीर सिंग नागलोट (छत्रपती संभाजीनगर) यांची मध्यप्रदेशातील मदसोर येथे ६ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर १७ वर्षांखालील गटातील कृष्णा सातपुते (संगमनेर) याची रांची, झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेतही गौतम स्कूलची खेळाडू
शिर्डी येथे २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलची कल्याणी वावधाने (नाशिक) हिने राष्ट्रीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदविला.
हॉकी व व्हॉलीबॉलमधील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडू तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव चैतालीताई काळे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
खेळाडूंना फिजिकल डायरेक्टर रमेश पठारे, इसाक सय्यद, राजेंद्र आढाव, महेश गोंडे, पर्यवेक्षिका ज्योती शेलार तसेच सर्व हाऊस मास्टर यांचे मार्गदर्शन लाभले.
अॅथलेटिक्स, कुस्ती आणि पारंपरिक खेळांनाही प्रोत्साहन
विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळेत अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि पारंपरिक खेळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
