शहापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी सुशोभीकरणाचे लोकार्पण; निळवंडेच्या पाण्याबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार
कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर
कोपरगाव : मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज यांसह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत गेल्या सात वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. जनतेने दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली असून, या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विकासाचा हा वेग कायम ठेवत जनतेच्या वाढत्या अपेक्षाही पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
शहापूर येथे नवनिर्मित ग्रामपंचायत कार्यालय इमारत तसेच स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण शनिवारी (दि. २८) आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहापूरसह धोंडेवाडी, बहादराबाद व जवळके परिसरात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी आ. काळे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

रस्त्यांच्या कामांना गती
गेल्या सात वर्षांत राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच गावांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित रस्त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामांसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, मतदारसंघाच्या विकासाचा वेग यापुढेही कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले यांना अभिवादन
यावेळी स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते, बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, नंदकिशोर औताडे, ज्ञानेश्वर गव्हाणे, सरपंच योगिताताई डांगे, रामचंद्र डांगे, गोरक्षनाथ घारे, रवींद्र वर्पे, दत्तात्रय खकाळे, शिवाजीराव घारे, मारुतीराव डांगे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट : ‘जनतेला कोण काम करतो, याची जाणीव’
ज्यांनी विकासकामे केली नाहीत, ते सध्या टीका आणि वायफळ बडबड करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक कामे गेल्या सात वर्षांत पूर्ण केली आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहतील. स्वतःच्या कार्यकाळात सांगण्यासारखे काही काम नसल्याने आता झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याची धडपड सुरू आहे. मात्र, जनतेला कोण काम करतो आणि कोण केवळ बोलतो, याची जाणीव आहे, अशी टीका आ. आशुतोष काळे यांनी केली.
