कोपरगाव | वृत्तवेध : काही श्रद्धांजली शब्दांत व्यक्त होतात, तर काही स्वरांतून इतिहास घडवतात. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या अस्थींचे विसर्जन ज्या हिंगणी बंधाऱ्यात झाले, त्याच ठिकाणी त्यांचे नातू आणि संजीवनी ग्रुपचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सॅक्सोफोनवर सुरेल धून सादर करत भावविश्व भारावून टाकले. हा क्षण केवळ एका संगीत कार्यक्रमाचा नव्हता, तर संस्कार, कृतज्ञता आणि कौटुंबिक परंपरेला स्वरांतून वाहिलेल्या अनोख्या श्रद्धांजलीचा ठरला.
दक्षिणगंगा गोदावरीच्या पवित्र तीरावर उभ्या असलेल्या ऐतिहासिक राघोबादादांच्या हिंगणी वाड्याने इतिहास, संस्कृती आणि संगीताचा दुर्मीळ संगम अनुभवला. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या पावन स्मृतींना सॅक्सोफोनच्या सुरांतून अभिवादन करत सुमित कोल्हे यांनी उपस्थितांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव दिला.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू, संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांचे सुपुत्र तथा अमित कोल्हे यांचे बंधू सुमित कोल्हे यांना संगीताची विशेष आवड असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विविध वाद्यांचा सातत्याने अभ्यास केला आहे. त्यांच्या साधनेची आणि संगीतावरील निष्ठेची प्रचिती हिंगणी वाड्यातील सॅक्सोफोन वादनातून प्रकर्षाने जाणवली.
कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या अस्थींचे विसर्जन ज्या ठिकाणी झाले, त्याच ठिकाणी सुमित कोल्हे यांनी स्वरांमधून श्रद्धांजली अर्पण केली. गोदावरीच्या शांत प्रवाहावर सॅक्सोफोनचे सूर घुमताच परिसरात विलक्षण शांतता आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी हा क्षण शांतपणे अनुभवत टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
या स्वरमय सादरीकरणात संजीवनी विद्यापीठाचे विद्यार्थी चिन्मय पाठक (छत्रपती संभाजीनगर), अनुग्रह अमोलिक आणि शुभम जाधव यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या साथीमुळे सादरीकरणाची रंगत अधिक खुलली.
यावेळी सुमित कोल्हे म्हणाले, “या ऐतिहासिक वास्तूमध्ये स्वरांची आराधना करताना विलक्षण सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. इतिहासाच्या साक्षीने संगीत सादर करण्याचा हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.”
दरम्यान, हिंगणी वाड्याचे ड्रोन चित्रीकरण, आकर्षक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूविषयी नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. वाड्याचा इतिहास आणि वारसा जाणून घेण्यासाठी अनेकांकडून विचारणा होत असून, या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनाची गरजही अधोरेखित होत आहे.
संगीताच्या माध्यमातून समाजघडणीचा उपक्रमही सुमित कोल्हे राबवत आहेत. त्यांच्या पुढाकारातून आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध वाद्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
◇ स्वरांतून व्यक्त झाले जीवनाचे तत्त्वज्ञान
“प्रत्येक धून सहज वाजवण्यासाठी नसते… काही धून तुम्हाला अधिक सक्षम, समृद्ध आणि परिपक्व बनवण्यासाठी असतात,” असे सांगत सुमित कोल्हे यांनी ए. आर. रहमान यांच्या गाजलेल्या ‘दीवाना दीवाना’ गीताची सॅक्सोफोनवर धून सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
◇ संजीवनीच्या ब्रास बँडचा राष्ट्रीय गौरव
संजीवनी ग्रुपने संगीत क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड पथकाने देशात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण इतिहास रचला. या विजयी संघासोबत विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव आणि टीम लिडर कॅडेट विपुल वाघ यांनी हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारला.
📲 ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि कोपरगावसह परिसरातील ताज्या, विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
