जिल्हा परिषद शाळांमध्ये सैनिकी शिस्तीचे धडे; संजीवनी सैनिकी स्कूलचा अभिनव राष्ट्रनिर्माण उपक्रम सुरू



शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्व आणि देशसेवेची भावना रुजविण्याचा संकल्प

कोपरगाव वृत्तवेध : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करण्यासाठी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण दिले जात असून भास्कर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे प्राथमिक धडे प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहेत.


संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या प्रेरणेने आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आकारास आला आहे. कोपरगाव तालुक्यातील भास्कर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.


यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलचे कॅम्पस अॅडमिन व माजी सैनिक विजय भास्कर यांनी प्रशिक्षणाचे नेतृत्व केले. राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर शाळेचा गौरव वाढविणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकाची भूमिका निभावत ग्रामीण विद्यार्थ्यांना सैनिकी कवायती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वाचे धडे दिले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सोनजे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्याबद्दल संजीवनी सैनिकी स्कूलचे प्राचार्य के. एल. दरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रशिक्षणात सहभागी झालेल्या माजी सैनिक, प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.


स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीतून उभारलेल्या संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाबरोबरच राष्ट्रनिर्मितीची मूल्ये जपण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम टप्प्याटप्प्याने कोपरगाव तालुक्यातील तसेच परिसरातील अधिकाधिक जिल्हा परिषद शाळांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे.


या कार्यक्रमास खिर्डी गणेश ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश भास्कर, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


वृत्तवेध विश्लेषण :
ग्रामीण विद्यार्थ्यांना लहान वयातच शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून भावी पिढी घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनीच प्रशिक्षक बनून ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, ही या उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरत आहे.

बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या