कोपरगाव : गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस अखेर शासनाने मंजुरी दिल्याने कोपरगाव व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार विवेक कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंगणी, मंजुर, माहेगाव देशमुख, डाऊच, सडे, शिंगवे, पुणतांबा आणि खेडलेझुंगे येथील बंधाऱ्यांवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असून सिंचनासाठी आवश्यक जलसाठा वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे परिसरातील शेतीसाठी जीवनवाहिनी मानले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत या बंधाऱ्यांवरील लोखंडी फळ्या जीर्ण झाल्याने पाणी साठवण क्षमतेवर मोठा परिणाम झाला होता. परिणामी हजारो एकर क्षेत्रातील ऊस, फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी व प्रशासकीय मंजुरीची मागणी केली होती. शासनाने या मागणीची दखल घेत संबंधित सर्व कामांना मंजुरी दिली आहे.
मंजूर कामांमध्ये नवीन लोखंडी फळ्या बसविणे, हिंगणी बंधाऱ्याच्या फाउंडेशनमधील पाणीगळती रोखणे, जीर्ण झालेले दगडी प्रूव्हज काढून नवीन एस.एस. चॅनल प्रूव्हज बसविणे तसेच सर्व बंधाऱ्यांवर संरक्षण रेलिंग उभारणे यांचा समावेश आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची कार्यक्षमता वाढून जलसाठा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार तातडीची दुरुस्तीची कामे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तर मोठ्या स्वरूपाची कामे ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे एलिप्टिकल पद्धतीत रूपांतर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील जलसाठा वाढण्यास मदत होणार असून शेतीला वर्षभर अधिक काळ पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्यासह शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने कोपरगाव आणि निफाड तालुक्यात समाधानाचे वातावरण असून जलसुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
