कोपरगाव वृत्तवेध:
चालू खरीप हंगामात कोपरगाव मतदारसंघात अद्यापही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांतील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. दुसरीकडे नाशिक, त्र्यंबकेश्वर, घोटी आणि इगतपुरी परिसरात चांगले पर्जन्यमान होत असून गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून कोपरगाव मतदारसंघातील गावठाणे, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि मातीचे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग तसेच नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात आमदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, अहिल्यानगर-नाशिक आणि मराठवाडा यांच्यातील प्रादेशिक पाणीवाटपाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मेंढेगिरी समितीने जायकवाडी धरणातील ६५ टक्के पाणीसाठ्याची अट निश्चित केली होती. त्यानंतर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मांदाडे समितीने ही अट कमी केली आहे.
सध्या नाशिक, घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात चांगला पाऊस होत असल्याने गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे. या परिस्थितीत गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून कोपरगाव मतदारसंघातील गावठाणे, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि मातीचे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी लाभधारक शेतकरी आणि नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
कोपरगाव मतदारसंघात चालू खरीप हंगामात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बहुतांश विहिरींमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणी उतरलेले नसून काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः मतदारसंघाच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांमध्ये नागरिक आणि पशुधनासाठी पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोदावरीचे ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांमार्फत फिरल्यास गावठाणे, पाझर तलाव आणि विविध बंधारे भरतील. त्यातून भूजलपातळी वाढण्यास मदत होऊन विहिरींना पाणी उपलब्ध होऊ शकते. याचा शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला मोठा लाभ होणार असल्याचे आमदार कोल्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच पालखेड कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगावच्या पूर्व भागातील कोळ नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. शासन आणि जलसंपदा विभागाने शेतकरी व नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आमदार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
वृत्तवेध फोकस
कोपरगाव मतदारसंघात पावसाचे प्रमाण कमी असल्याने भूजलपातळी वाढविण्यासाठी गोदावरी आणि पालखेड कालव्यांच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा उपयोग करून स्थानिक जलस्रोत भरून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
