कोपरगाव वृत्तवेध:
कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी दाखविलेला पराक्रम हा देशाच्या इतिहासातील सुवर्णअध्याय असून, त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. शहीद जवानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सैन्यदलात दाखल होण्याचा संकल्प करावा आणि शाळा, पालक व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. भारतीय सैन्याचे सुभेदार वैभव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस ॲडमिन व माजी सैनिक विजय भास्कर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित कोल्हे म्हणाले की, संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी शैक्षणिक समूह सातत्याने प्रगतीपथावर आहे. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्या काळात संपूर्ण देश दूरदर्शनवर युद्धाच्या घडामोडी पाहत होता. भारतीय जवानांच्या पराक्रमाने मिळविलेल्या विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान होता. आजही कारगिलची शौर्यगाथा विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, धैर्य आणि समर्पणाची प्रेरणा जागविते.
प्रमुख पाहुणे सुभेदार वैभव कदम यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन करताना सांगितले की, २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने शौर्य, धैर्य आणि अटळ जिद्दीच्या बळावर ऐतिहासिक विजय मिळविला. दुर्गम व उंच पर्वतरांगांमध्ये ठाण मांडून बसलेल्या शत्रूचा मुकाबला करत भारतीय सैन्याने बोफोर्स तोफखाना आणि तिन्ही सैन्यदलांच्या समन्वित कारवाईच्या बळावर विजयश्री खेचून आणली.
या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले. त्यांच्या बलिदानाची स्मृती प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जिवंत राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संजीवनी संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरू केलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचा विशेष गौरव केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्यदलात दाखल होऊन देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यात या केंद्राचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यशासाठी सातत्य, संघर्षाची तयारी आणि सहनशीलता आवश्यक असून, सैनिक शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर राष्ट्रनिष्ठ, शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम नागरिक घडविते, असेही सुभेदार कदम म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य कैलास दरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कारगिल युद्धातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी गाथा विद्यार्थ्यांसमोर उलगडताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी शहीद जवानांच्या आदर्शावर चालत राष्ट्रसेवेसाठी स्वतःला घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष सूर्यवंशी यांनी केले.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
