कोपरगाव | वृत्तवेध
कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळा यंदा भावनिक वातावरणात पार पडला. कृष्णाई बॅन्क्वेट हॉलमध्ये हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी संवाद साधताना स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींनी आ. काळे यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या भावनिक मनोगतामुळे संपूर्ण सभागृह काही क्षण स्तब्ध झाले.
“माझ्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी साडेसहा वाजता अजितदादांचा शुभेच्छांचा फोन यायचाच. अनेक वर्षांची ती प्रेमाची परंपरा होती. पण यंदा तो फोन येणार नाही, ही जाणीव मनाला असह्य वेदना देणारी आहे. वाढदिवस दरवर्षी येईल, पण अजितदादा पुन्हा कधीच परत येणार नाहीत,” असे सांगताना आ. काळे भावूक झाले.
यंदा वाढदिवस साजरा करण्याची मनापासून इच्छा नव्हती, असे सांगत त्यांनी स्व. अजितदादांच्या निधनानंतर गेलेले सहा महिने अजूनही मन स्वीकारू शकले नसल्याचे नमूद केले. “आजही वाटते, दादा कुठेतरी भेटतील, पुन्हा एकदा प्रेमाने विचारपूस करतील. ही आशा मनातून जात नाही,” असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांचा आग्रह आणि जनतेचे प्रेम लक्षात घेऊनच अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एका बाजूला जनतेचा विश्वास आहे, तर दुसऱ्या बाजूला दादा नसल्याची पोकळी कायम मनाला अस्वस्थ करत आहे. त्यांच्या शुभेच्छांशिवाय साजरा झालेला हा पहिला वाढदिवस आयुष्यभर वेदना देत राहील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
स्व. अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना आ. काळे म्हणाले की, “दादांनी आम्हाला माणुसकीची वाट दाखवली. जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याचे शिकवले. संकटांशी खंबीरपणे लढण्याची ताकद दिली. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, संस्कार आणि कार्य माझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक राहतील.”
भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. वाढदिवसाचा आनंद आणि स्व. अजितदादांच्या आठवणींची वेदना यांचा भावनिक संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
