कोपरगाव वृत्तवेध:
रिझर्व्ह बँक आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन, पारदर्शक कर्जवाटप आणि प्रभावी कर्जवसुलीच्या जोरावर गौतम सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सन २०२५-२६ अखेर बँकेच्या ठेवी १४८ कोटी रुपये होत्या. त्यात सातत्याने वाढ होत असून, आजमितीस ठेवी १७५ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. सभासदांचा बँकेवरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
गौतमनगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात शनिवारी गौतम सहकारी बँकेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. बँकेचे मार्गदर्शक तथा माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संजय आगवण होते.
बँकेचा मिश्र व्यवसाय २३८ कोटींवर
गौतम सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे आणि संभाजीनगर जिल्ह्यांत असून, नऊ शाखांमधून विविध घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जात आहेत. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून कर्जवाटप करण्याबरोबरच कर्जवसुलीवरही विशेष लक्ष दिले जात असल्याने बँकेचा आर्थिक कारभार सक्षमपणे सुरू असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सभेसमोर मांडला. आरबीआयचे नियम, वाढती स्पर्धा आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात बँकेने भक्कम कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचा मिश्र व्यवसाय २०४ कोटींवरून २३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सन २०२५-२६ मध्ये बँकेला ४ कोटी १४ लाख ६ हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, सर्व कायदेशीर तरतुदी पूर्ण केल्यानंतर १ कोटी ३५ लाख ४८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ एनपीए मागील काही वर्षांपासून शून्य टक्के असल्याचेही घेमुड यांनी सांगितले.
‘सभासदांशी ग्राहकांपेक्षा आपुलकीचे नाते’
खासगी बँकांशी स्पर्धा करताना गौतम सहकारी बँक ग्राहकांना आधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. खासगी बँकांकडे ग्राहक असतात; मात्र गौतम बँकेशी सभासदांचे केवळ ग्राहक म्हणून नव्हे, तर आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. हा विश्वास जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
बँकेची शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन गौतम सहकारी बँकेला आणखी प्रगतीच्या उंचीवर न्यावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
सर्व विषयांना सभासदांची एकमताने मंजुरी
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषयपत्रिकेवरील १ ते १६ विषय सभेसमोर मांडले. सभासदांनी सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षपदाची सूचना राजेंद्र ढोमसे यांनी मांडली, तर भागीनाथ काळे यांनी अनुमोदन दिले. आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव संचालक दत्तात्रय खेमनर यांनी मांडला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्रशांत घुले, सुनील मांजरे, शंकरराव चव्हाण, मनोज जगझाप, दिनार कुदळे, श्रावण आसने, ज्येष्ठ नेते कारभारी आगवण, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, सोमनाथ चांदगुडे, सुभाष गाडे आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन वैभव महाजन यांनी केले. आभार चेअरमन संजय आगवण यांनी मानले.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
