कोपरगाव वृत्तवेध:
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी व दागिन्यांच्या कथित चोरीच्या प्रकारावरून कोपरगावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. “श्रीराम मंदिरातील कथित चोरी हा केवळ चोरीचा प्रकार नसून तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान आहे. या प्रकरणाचे सत्यशोधन होऊन योग्य न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही,” असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी दिला.
या कथित प्रकाराच्या निषेधार्थ शनिवारी (८ ऑगस्ट) कोपरगाव शहरातील खंदक नाला येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात शिवसेना उबाठाचे पदाधिकारी, शिवसैनिक, रामभक्त आणि हिंदुत्वप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करण्यात आली. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
शोभायात्रेत मोठा सहभाग
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून श्री संकटमोचन हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शिवसैनिकांसह सर्वपक्षीय नागरिक, रामभक्त आणि हिंदुत्वप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंदिरात पोहोचल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अयोध्येतील कथित चोरीच्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
सायंकाळी सातच्या सुमारास रामरक्षा आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर महाआरतीने आंदोलनाची सांगता झाली.
‘श्रद्धेच्या नावावर महालूट?’ — प्रमोद लबडे
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रमोद लबडे यांनी या कथित प्रकारावर तीव्र शब्दांत टीका केली. हा प्रकार हिंदूंच्या श्रद्धेचा अनादर असून भक्तीच्या नावावर झालेली ‘महालूट’ असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी महाराष्ट्रात या कथित चोरीविरोधात साधा निषेधही नोंदवला नाही, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली.
तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी हा प्रकार रामभक्तांच्या श्रद्धा आणि भावनेवर घातलेला दरोडा असल्याचे म्हटले. या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ट्रस्टच्या कारभाराच्या चौकशीची मागणी
यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कारभाराची सखोल चौकशी करून ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीराम मंदिरातील कथित चोरीचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर यावा, असा संतप्त सूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
सचिन कोते यांचा सरकारला सवाल
जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी श्रद्धेच्या नावाने देशवासीयांचा विश्वास संपादन करणाऱ्यांच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका केली. “कथित चोरीच्या या प्रकारामागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनाला संपर्कप्रमुख आशुतोष मार्कंडे, जिल्हाप्रमुख सचिन कोते, माजी जिल्हाप्रमुख सौ. सपना भरत मोरे, सहसंपर्कप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख भरत मोरे, नाना सावंट्रे, मनोज जाधव, मनोज कपोते, राजू शेख, शहरप्रमुख बालाजी गोरडे, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, संपतराव लोंढे, राजाभाऊ देशमुख, सचिन आसणे, कृष्णा अहिरे, रफिक शेख, आदित्य लोणारी, ज्ञानेश्वर मगर, सौरव वालझाडे, मयूर काळे, निलेश वाणी, किरण सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, अर्जुन मोरे, मधुकर पवार, अशोक कानडे, महेश कुलकर्णी, योगेश मोरे, आबा पवार, गणेश जाधव, सुनील दवंगे, लक्ष्मण मंजुळ, लक्ष्मण रोकडे, सागर गोडगे, गिरीधर पवार, प्रतीक मोरे, अभिषेक घोडके, सतीश मंडलिक, कृष्णा मंडलिक, बंडू गवळी, अमित घोरपडे, अजय पाठक, अनिल पाठक, पदे गुरुजी, मनसेचे अनिल गायकवाड, राहुल आप्पा आढाव, अमित भास्कर, रोहित जाधव यांच्यासह शिवसैनिक, रामभक्त आणि हिंदुत्वप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कथित चोरीच्या या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
