कोपरगाव वृत्त वेध:
दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरही कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायम आहे. रस्त्यावर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असताना नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात अखेर संतापाचा बांध फुटला. “नागरिकांचा जीव महत्त्वाचा की सत्तेचे राजकारण?” असा थेट सवाल करीत बुधवार (दि. १९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे हजारो कोपरगावकरांनी जनआक्रोशाचा एल्गार केला.
माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत, “मोकाट जनावरांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पालिका प्रशासनाला सक्त सूचना दिल्या असतानाही कारवाई होत नसेल, तर ही जनावरे तुमच्या नातेवाईकांची आहेत का?” असा उपरोधिक सवाल केला.
“कोपरगावला समृद्धी मिळाली नाही तरी चालेल; पण नागरिकांना मूलभूत सुविधा आणि सुशासन मिळालेच पाहिजे,” असे स्पष्ट करत त्यांनी तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाने नगरपरिषदेला कारवाईस भाग पाडावे, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.
‘१०० दिवसांत १०० कामे’चा फुगा फुटला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी सत्ताधाऱ्यांच्या निवडणूक आश्वासनांची अक्षरशः चिरफाड केली. “१०० दिवसांत १०० कामे करू, मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवू, अशी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. मात्र आज दोन नागरिकांचा बळी गेल्यानंतरही प्रश्न जैसे थे आहे,” असा आरोप त्यांनी केला.
बाजारतळ येथे गोशाळा सुरू करण्याच्या घोषणेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. “गोशाळा सुरू करण्याची घोषणा करता; पण प्रत्यक्षात सत्ताधारी नगरसेवकांमध्येच वाद होतात. खरंच गोशाळा सुरू करणार आहात की हीदेखील घोषणा हवेतच विरणार?” असा सवाल त्यांनी केला.
टेंडरच्या आरोपांनी आंदोलन तापले
मोकाट जनावरे पकडण्यासाठी वारंवार टेंडर काढूनही ठेकेदार पुढे येत नसल्याचा गंभीर आरोप गंगुले यांनी केला. “टेंडर घेणाऱ्याला कार्यकर्ते अॅडजेस्ट करण्यास सांगितले जाते, त्यामुळे कोणीही पुढे येत नाही,” असा दावा त्यांनी केला. या आरोपांची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
“नागरिकांचे जीव जात असताना कार्यकर्त्यांची पाकिटे सांभाळण्यात ऊर्जा खर्च करू नका,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला.
डुकरांमुळे झालेल्या मृत्यूचा संदर्भ देत, “एक बळी गेल्यानंतर नगरपालिकेने किती डुकरे पकडली, हे जनतेसमोर जाहीर करा,” अशी मागणी त्यांनी केली. मोकाट जनावरांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.
‘गोशाळेसाठी जमीन देतो; राजकारण करू नका!’
अय्यूब शेख यांनी काजी ईनाम नावावर असलेल्या जमिनीपैकी दीड ते दोन एकर जागा गोशाळेसाठी देण्याची तयारी दर्शविली. “प्रश्न नागरिकांच्या जीविताचा आहे. त्यावर राजकारण न करता कायमस्वरूपी उपाय करा,” असे त्यांनी सुनावले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे असलम शेख यांनी ‘१०० दिवसांत १०० कामे’ या आश्वासनावरून नगराध्यक्षांना लक्ष्य केले. “१०० कामे सोडा, १०० ढापेही टाकता आले नाहीत. प्रशासक काळात काय झाले, याचे रडगाणे आणखी किती दिवस?” असा सवाल त्यांनी केला.
रस्ते नागरिकांसाठी की मोकाट जनावरांसाठी?
उद्धव ठाकरे सेनेचे शहर प्रमुख गगन हाडा यांनी शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर इतका वाढला आहे की नागरिकांना चालणेही मुश्कील झाल्याचे सांगितले. पोलिसांनाही या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. या दोन बंधूंच्या झालेल्या मृत्यूची पत्रकारांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने दखल घेऊन हळहळ व्यक्त केली असल्याचं सांगितले
ज्येष्ठ नागरिक विजय बंब यांनी मोकाट जनावरांचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली. मनसेचे अनिल गायकवाड यांनीही प्रशासनाला इशारा देत प्रश्न न सुटल्यास मनसेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे स्पष्ट केले.
हाजी मेहमूद सय्यद यांनी काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी निवेदन देऊनही प्रशासनाने कारवाई केली नसल्याचा आरोप केला. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा आढाव यांनी पत्रकारांनी या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल आभार मानत, लाखो रुपये खर्चून बांधलेला स्विमिंग पूल नागरिकांच्या उपयोगाचा नसेल तर “किमान मोकाट जनावरांसाठी तरी वापरा,” असा बोचरा टोला लगावला.
यमराजाच्या वेशात सवाल; ‘१०० कामे की १०० बळी?’
आंदोलनातील भावेश थोरात यांची यमराजाची वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. नगराध्यक्षांच्या ‘१०० दिवसांत १०० कामे’ या घोषणेवर निशाणा साधत त्यांनी “१०० दिवसांत १०० कामे नव्हे, तर १०० बळी घेण्याचे ठरवले आहे की काय?” असा संतप्त सवाल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या गौरीताई पहाडे, नगरसेवक विजय त्रिभुवन, मंदार पहाडे, सचिन गवारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, मनसे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वासनावर आंदोलन स्थगित; शब्द पाळला नाही तर ‘एल्गार’ पुन्हा!
पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र “आश्वासन कागदावर नको, रस्त्यावर परिणाम दिसला पाहिजे. शब्द पाळला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिला.
दोन नागरिकांचे जीव गेले आहेत. आता आणखी किती बळी गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार? हा प्रश्नच या जनआक्रोशाने कोपरगावच्या सत्ताधाऱ्यांसमोर उभा केला आहे.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
