कोपरगाव वृत्तवेध:
खिर्डी गणेश सबस्टेशनअंतर्गत आरडीएसएस योजनेतील गेल्या तीन-चार महिन्यांपासून रखडलेली वीज कामे अखेर मार्गी लागली आहेत. नवले वस्ती गावठाण, सुराळकर वस्ती आणि नवीन कॅनल गावठाण येथील डीटीसीची प्रलंबित कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, येत्या काही दिवसांत नागरिकांना अधिक स्थिर आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरडीएसएस योजनेची गँग उपलब्ध नसल्यामुळे ही कामे रखडली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महावितरणच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली असून, प्रलंबित कामांना गती मिळाली आहे.
नवले वस्तीत ५० ते ६० घरांना दिलासा
नवले वस्ती गावठाण येथील डीटीसीचे काम सुमारे तीन महिन्यांपासून प्रलंबित होते. या ठिकाणी सात पोल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठ दिवसांत डीटीसी कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
डीटीसी सुरू झाल्यानंतर सुमारे ५० ते ६० घरांना शेती वाहिनीऐवजी गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे शेती वाहिनीवरील भार कमी होऊन गावठाणातील वीजपुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होणार आहे.
सुराळकर वस्तीत डीटीसीचे काम पूर्ण
सुराळकर वस्ती येथील डीटीसीचे कामही चार महिन्यांपासून रखडले होते. नवीन डीटीसीचे काम पूर्ण झाले असून एलटी बाजूचे चार पोल उभारण्यात आले आहेत. लाईन ओढण्याचे काम पूर्ण करून येत्या आठ दिवसांत डीटीसी सुरू करण्याचे नियोजन आहे.
यामुळे या भागातील ३० ते ४० घरांना गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा मिळणार आहे.
नवीन कॅनल गावठाणातील काम अंतिम टप्प्यात
नवीन कॅनल गावठाणातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील डीटीसीचे कामही चार महिन्यांपासून प्रलंबित होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या चार दिवसांत सुमारे २० ते २५ व्यावसायिक ग्राहकांना गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे.
शेती वाहिनीवरील भार कमी; वीजपुरवठा अधिक स्थिर होणार
या तिन्ही कामांमुळे गावठाणातील नागरिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती वाहिनीवरील भार कमी झाल्याने गावठाणातील वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि स्थैर्य सुधारण्यास मदत होणार आहे.
प्रलंबित कामांचा आढावा घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत ती प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांचा पाठपुरावा सुरू आहे.
“नुसती आश्वासने न देता नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळाल्या पाहिजेत,” या भूमिकेतून प्रलंबित वीज कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, आता कामे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
