कोपरगाव | वृत्तवेध :
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी नदीकाठच्या धार्मिक व पर्यटनस्थळांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोदावरीवरील घाटांची बांधणी व विकास, प्रमुख रस्त्यांची सुधारणा, विद्युत रोषणाई आणि परिसर सुशोभीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.
आ. काळे यांनी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबतचे लेखी निवेदन सादर केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून कोपरगावमध्ये साधू-संत आणि लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
गोदावरीच्या तीन ठिकाणी नवीन घाटांची मागणी
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी नदीवर चासनळी, मोर्वीस आणि कोकमठाण येथे नवीन घाट बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुंभारी, कोपरगाव बेट आणि संवत्सर येथील घाटांचा विकास करून घाट परिसरातील रस्ते, विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणाची कामे करण्याची मागणीही आ. काळे यांनी केली.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरही भर
भाविकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेलाही आ. काळे यांनी प्राधान्य दिले आहे. राज्य मार्ग ६५ वरील रांजणगाव देशमुख ते झगडे फाटा, पढेगाव ते उक्कडगाव तसेच राज्य मार्ग ७ वरील कोळगाव पाटी ते देर्डे फाटा आणि एनएच-१६० पर्यंतच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ऐतिहासिक-पौराणिक वारशाला मिळणार नवी ओळख?
कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. गोदावरी नदीकाठची धार्मिक स्थळे आणि घाट यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे घाट विकासासोबतच परिसराचे सुशोभीकरण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास कोपरगावच्या धार्मिक व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. निवेदनाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असा सकारात्मक प्रतिसाद मंत्री महाजन यांनी दिल्याची माहिती आ. काळे यांनी दिली.
वृत्तवेध फोकस
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता गोदावरीकाठच्या धार्मिक स्थळांसाठीही मोठी संधी ठरू शकतो. त्यामुळे कोपरगावच्या घाट आणि रस्ते विकासासाठी मागितलेल्या निधीला शासनाकडून प्रत्यक्ष मंजुरी कधी मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.

