इंजिनिअरिंगपुरती GATEची मर्यादा नाही; विज्ञान शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही संधी — नियोजन, सराव आणि तांत्रिक अभ्यासावर भर
कोपरगाव | वृत्तवेध : GATE आणि IIT-JAM या परीक्षांकडे केवळ प्रवेश परीक्षा म्हणून न पाहता उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधींचे प्रवेशद्वार म्हणून विद्यार्थ्यांनी पाहावे, असे आवाहन IIT मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधकांनी केले. GATE परीक्षा केवळ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थीही या परीक्षेस पात्र असतात. GATEमध्ये चांगला गुण मिळविल्यास देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, अशी माहिती संशोधक संथाकुमार व्ही. यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने ‘आयआयटी-जॅम व गेट परीक्षा जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संथाकुमार व्ही. बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.
‘गेट’साठी तयारी कशी करावी?
विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करताना स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात, नियमितपणे सराव करावा, मॉक टेस्ट सोडवाव्यात आणि तांत्रिक विषयांच्या संकल्पना अधिक स्पष्ट करून घ्याव्यात, असा सल्ला संथाकुमार व्ही. यांनी दिला. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयआयटी-जॅम म्हणजे सुवर्णसंधी
IIT मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधक साईकत साहा यांनी आयआयटी-जॅम परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. मूलभूत विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची असून, तिच्या माध्यमातून IITसारख्या नामांकित संस्थांमध्ये एम.एस्सी., संयुक्त एम.एस्सी.-पीएच.डी. तसेच एकात्मिक पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी मिळू शकते. योग्य नियोजन, संकल्पना स्पष्ट असणे आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी साईकत साहा यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुणपद्धती आणि वेळेचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
‘पारंपरिक करिअरच्या पलीकडे पाहा’
प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अध्यक्षीय मनोगतात आयआयटी-जॅम आणि गेटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबरच संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध होतात. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीपलीकडे जाऊन संशोधन, उद्योग, उद्योजकता आणि नव्या ज्ञानक्षेत्रांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत व परिचय रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. चंद्रभान चौधरी यांनी करून दिला. व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. निलेश मालपुरे, डॉ. विलास गाडे आणि प्रा. अश्विनी पाटोळे उपस्थित होते.
विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसह बी.एस्सी. आणि बी.सी.एस.च्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले, तर आभार प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी मानले.
