कोपरगाव वृत्तवेध:
डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेती मशागतीचा खर्च वाढत असताना, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीच्या नव्या युगाकडे पहिले पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.
माँत्रा इलेक्ट्रिक कंपनीने शेती तसेच अन्य कामांसाठी विकसित केलेल्या ४५ एचपी क्षमतेच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची राज्यातील पहिली खरेदी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने केली आहे. या ट्रॅक्टरची पहिली प्रात्यक्षिक राइड गुरुवारी शिर्डी येथे घेण्यात आली. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी ट्रॅक्टरची तांत्रिक वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली.
डिझेलचा खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक पर्याय
यावेळी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “इंधनाच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर हा खर्च कमी करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. भविष्यात शेतीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असून, शेतकऱ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे.”
आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षांमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतीवर होऊ शकतो. त्यामुळे इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन तासांच्या चार्जमध्ये १०० किमीपर्यंत प्रवास
माँत्रा इलेक्ट्रिकचे महाराष्ट्र विभागीय प्रमुख प्रकाश गिरी यांनी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले.
विक्री विभागाचे बलराम मूर्ती यांनी ट्रॅक्टरच्या क्षमतेची माहिती देताना, दोन तासांच्या सिंगल चार्जमध्ये सुमारे १०० किलोमीटरपर्यंत प्रवास करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. त्यामुळे डिझेलवरील खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
हो पर्यावरणपूरक शेती साधनांना प्राधान्य
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक शेतीच्या साधनांना प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक मंडळ, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख तसेच शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश गिरी, बलराम मूर्ती आणि चैतन्य कापसे यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे तांत्रिक प्रात्यक्षिक करून दाखविले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
