कोपरगाव, वृत्तवेध :
बदलत्या सामाजिक आणि जागतिक परिस्थितीत कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत परिश्रम करावेत, असे प्रतिपादन प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी केले.
स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कला शाखाप्रमुख प्रो. (डॉ.) जिभाऊ मोरे उपस्थित होते.
सामाजिक जबाबदारीची जाणीव जपा
डॉ. जिभाऊ मोरे यांनी बदलत्या जागतिक परिप्रेक्ष्यात कला शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.
‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि बदलते शैक्षणिक प्रवाह’वर मार्गदर्शन
भूगोल विभागप्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि बदलते शैक्षणिक प्रवाह’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या शिक्षणव्यवस्थेतील संधी आणि विद्यार्थ्यांनी स्वीकारावयाच्या नव्या शैक्षणिक दृष्टिकोनावर त्यांनी प्रकाश टाकला.
मंडळाचे प्रमुख डॉ. सुरेश देवरे यांनी सामाजिक शास्त्रे मंडळाची उद्दिष्टे तसेच वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप बागुल यांनी केले, तर डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी आभार मानले. सामाजिक शास्त्रे मंडळाच्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
