संजीवनी विद्यापीठाच्या धनश्री देवकर, स्वस्तिका जगताप यांच्या ‘क्लॉड एआय लिटरसी’ संशोधनाची ग्लोबल एआय समिटसाठी निवड
कोपरगाव वृत्त वेध:
ग्रामीण मातीत शिकलेल्या संजीवनी विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींनी थेट ऑक्सफर्डच्या जागतिक व्यासपीठावर झेप घेतली आहे! धनश्री सुनील देवकर आणि स्वस्तिका कुलदीप जगताप यांच्या ‘क्लॉड एआय लिटरसी’ या संशोधन पेपरची ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात होणाऱ्या ‘ग्लोबल एआय समिट २०२६’ या प्रतिष्ठित जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे.
जगभरातून केवळ १६ संशोधकांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये संजीवनी विद्यापीठाच्या या दोन्ही विद्यार्थिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, निवड झालेल्या संशोधकांमध्ये धनश्री आणि स्वस्तिका या सर्वात कमी वयाच्या संशोधक असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे संजीवनी विद्यापीठाच्या ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचालीला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.
ग्रामीण विद्यार्थिनींचा थेट ऑक्सफर्डपर्यंत प्रवास!
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्थापन केलेल्या ‘एर्डोस रिसर्च’ संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ज्ञ आणि संस्थेचे संस्थापक प्रा. अजित जावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री देवकर आणि स्वस्तिका जगताप यांनी हा संशोधन पेपर तयार केला.
‘क्लॉड एआय लिटरसी’ या संशोधनातून शिक्षक, विद्यार्थी, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला.
एकच धडा, दोन पद्धती; एआयने मारली बाजी!
या संशोधनासाठी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी आणि संजीवनी अकॅडमी, कोपरगाव येथे प्रत्यक्ष प्रयोग करण्यात आले.
प्रयोगात प्रथम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच्या पद्धतीने धडा शिकविला. त्यानंतर धनश्री आणि स्वस्तिका यांनी संशोधनातून विकसित केलेल्या क्लॉड एआय लिटरसी पद्धतीचा वापर करून त्याच विद्यार्थ्यांना तोच धडा शिकविला.
यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये एआयच्या सहाय्याने शिकविलेल्या पद्धतीत विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाल्याचे संशोधनातून दिसून आले. त्यामुळे अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि शैक्षणिकदृष्ट्या नियोजित वापर केल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक होऊ शकते, असा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.संजीवनीच्या ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचालीवर शिक्कामोर्तब
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी संजीवनी विद्यापीठाची ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचाल पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी धनश्री आणि स्वस्तिका यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते धनश्रीचे पालक सुनील देवकर, श्रद्धा देवकर तसेच स्वस्तिकाचे पालक कुलदीप जगताप, अश्विनी जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. सरिता पवार, डॉ. देवयानी भामरे आदी उपस्थित होते.
‘ग्रामीण मुलींनाही जागतिक व्यासपीठ मिळू शकते!’
धनश्रीचे वडील सुनील देवकर यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, ग्रामीण भागातील आपल्या मुलीला संजीवनी विद्यापीठाच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी देणाऱ्या शिक्षणपद्धतीचेही यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
स्वस्तिकाच्या पालक अश्विनी जगताप यांनीही संवत्सरासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलीच्या संशोधनाची ऑक्सफर्ड विद्यापीठाने निवड केल्याचा अभिमान व्यक्त केला. संजीवनी विद्यापीठामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वृत्तवेध विशेष | ‘रूरल टू ग्लोबल’ची थेट उड्डाण!
ग्रामीण भागातील दोन विद्यार्थिनी. विषय—कृत्रिम बुद्धिमत्ता. संशोधन—ऑक्सफर्डच्या जागतिक व्यासपीठासाठी निवड. जगभरातून केवळ १६ संशोधकांची निवड होत असताना त्यात संजीवनी विद्यापीठाच्या धनश्री देवकर आणि स्वस्तिका जगताप यांचा समावेश होणे ही कोपरगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे त्या निवड झालेल्या संशोधकांमध्ये सर्वात कमी वयाच्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक पंख मिळू शकतात, हे या दोन्ही विद्यार्थिनींनी कृतीतून दाखवून दिले आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
