कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना पोलिसांचा इशारा; शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई
कोपरगाव | वृत्तवेध :
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी ३२ जणांवर तडीपारीची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. उत्सवाच्या काळात शांतता भंग करून कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून संबंधित ३२ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस प्रशासनानेही गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा विशेष शाखेने १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीत योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तडीपार केलेल्या व्यक्तींची नावे
पोलिसांच्या माहितीनुसार या कारवाईत अमर बाबू कच्छी, रोहित छगन साळवे, सुनील उर्फ सनी शिवाजी गायकवाड, वसीम चांदभाई चोपदार, सुनील शिवाजी भुजबळ, अनिल गणेश जाधव, अनिकेत भूषण उर्फ सुबोध सोमनाथ मोरे, तुषार राजेंद्र दुशिंग, राहुल विजय चवंडके, राहुल शिवाजी शिदोरे, स्वप्नील सुरेश गायकवाड, शफिक शरीफ कुरेशी, सत्तार गफ्फार कुरेशी, सोनू मज्जू कुरेशी, सलमान लतिफ कुरेशी, मज्जू हुसेन कुरेशी, लतिफ शरीफ कुरेशी, आरबाज माजिद कुरेशी, आसिफ रफिक कुरेशी, पापा फकिरा मोहम्मद कुरेशी, शाहरुख लतिफ कुरेशी, अभिषेक संजय साठे, विशाल शांताराम पिंगळे, तनवीर मोहम्मद रंगरेज, शुभम उर्फ लारा सुनील जाधव, तोहिद इरफान कुरेशी, युवराज विलास खरात, युसुफ सिकंदर सय्यद, राहुल शिवाजी शिदोरे, सोनू उर्फ सोन्या कैलास आव्हाड आणि मझहर अल्लाउद्दीन शेख यांचा समावेश आहे.
उत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि मिरवणुका होत असल्याने पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असते. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.
उत्सवाचा जल्लोष करा; मात्र कायदा हातात घेऊ नका, असा स्पष्ट संदेशच या कारवाईतून कोपरगाव शहर पोलिसांनी दिला आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
